कोल्हापूर न्यूज / वि.रा.भोसले
आर .आर आबा महाराष्ट्राचे गृहमंत्री होते.
आपल्या कार्यालयात फाईलीत डोके घालून कांहीं तरी वाचण्यात गुंग होते.
टेबलासमोर एक धिप्पाड व्यक्ती येऊन उभी होती. आबांचे लक्ष गेले . पाया पासून ते डोक्यापर्यंत त्या व्यक्तीला क्षणार्धात पाहिले आणि आबा ताडकन उभे राहिले.
"हसन साहेब ,तुम्हीं !
या ना बसा.कांहीं फोन नाही कांहीं कल्पनाही दिली नाही ,असे अचानक कसे काय आलात ? "
" आबा, देवळात जायला विचारायची आणि आधी सूचना द्यायची गरज नसते."
काय हे साहेब ,मी काय देव आहे का ! तुम्हीं मला एकदम देव्हाऱ्यात बसवलंत की .असो ते जाऊदे काय काम काढलंत असं अचानक ?
काम माझं नाही .भुदरगड तालुक्यातील एका उमद्या पोराचं आहे.पी एस आय परीक्षेत सिलेक्ट झालाय .पण कुठल्या तरी किरकोळ कारणामुळे मुळे त्याचा पोलिस रिपोर्ट अडून राहिलाय.त्यामुळे त्याची नियुक्ती सुध्दा रखडली आहे.
कुठाय तो मुलगा ?
"बाहेर आहे.ये रे बाळ .सांग काय ते साहेबांना."
आज आबा आपल्यात नाहीत.तो मुलगा आता डी वाय एस पी झालाय. हसन साहेब आणि आबा यांना तो आजही देवासारखा पुजतो.
ना.हसन मुश्रीफ यांची काम करण्याची पद्धत कशी असते त्याचा हा एक नमुना.स्वतःचे मंत्रालय सोडून चालत ते एका पोराला घेऊन आबांच्या कार्यालयात गेले.तो पोर त्यांच्या मतदार संघांपैकीही नव्हता. त्याचा विश्वास मात्र हसन साहेब नावाच्या व्यक्तीवर होता.त्याचा कागलातला एक मित्र त्याला हसन साहेबांकडे घेऊन गेला होता.
बाही पकडुन काम करून घ्यावे असा हक्काचा विश्वासाचा आणि आपुलकीचा माणूस म्हणजे ना.हसन मुश्रीफ .
आता ते नवव्यांदा मंत्री झालेत. आमदारकीच्या निवडणुकीत त्यांच्या पुढे मोठे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न झाला.त्यांच्या सर्व समर्थकांना मात्र विश्वास होता की आपला साहेब कामाच्या जोरावर निवडून येणार.बिनीच्या कार्यकर्त्यांनी मुलाखतीत सांगितले की साहेब घरात बसले तरी निवडून येणार .विकास कामांचा डोंगर त्यांनी उभा केला आहे. माय भगिनी आरती घेऊन उभ्या आहेत.
हसन मुश्रीफ यांच्या साठी दिग्गज नेते रिंगणात उतरले.जात पात धर्म असले दगड गोटे त्यांनी दूरवर भिरकावून दिले आणि मैदान साफ केले.माजी खासदार संजयदादा मंडलिक,माजी आमदार संजय बाबा घाटगे ,शेतकरी संघाचे अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील,के डी सी चे संचालक भैय्या माने यांनी अक्षरशः जीवाचे रान केले.
मंत्री म्हणून नव्हे तर एक हक्काचा माणूस म्हणून .
पहाटे पाच पासून सामान्यातल्या सामन्यांची वर्दळ त्याच्या घरासमोर सुरू असते. दार ठोठावणे नाही,आवाज देणे नाही.आंघोळीने भिजलेले डोके टॉवेल ने पुसतच साहेब बाहेर येतात.
बसा,बसा .बोला .
फोन लावून देणारा, पत्रे टाईप करणारा राईटर , सगळे जय्यत तयार असतात.
भल्या पहाटे साहेबांचा फोन आला की चादर झाडून अधिकारी अंथरुणातून उठून उभे राहायचे.
कामाची ही पद्धत फार थोड्यांना जमते.
सरकारी कामे असोत दवाखाना असो .कोणाचे तोरण असो किंवा कोणाचे मरण असो हसन मुश्रीफ नावाचा हक्काचा माणूस तेथे हजर असायचा.
त्यांना पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे.
त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो बहीण,भाऊ ,काका,मामा या सामान्य माणसांना जणू अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती मधली मोठी लॉटरी लागल्याचा आनंद झाला आहे.
पुन्हा ती वर्दळ , फोनच्या रींगा, टाईप राईटरची खट खट अखंड सुरू राहील.
सामान्य माणसासाठी आपल्या हक्काच्या माणसाची.
--------------------------------

