कोल्हापूर न्यूज नेटवर्क
असला कसला हा ३१डिसेंबर. ? दारू ढोसण्यासाठी शोधून काढलेले एक निमित्त.
खायचे ,प्यायचे आणि धुंद होऊन नाचायचे.
जागा कुठली ?
सर पिराजी तलाव.सारे शहर या तलावाचे पाणी पिते.या तलावाच्या काठावर वर्षाखेरची पार्टी.
मध्यरात्री १२वाजता दारूच्या बाटल्या ढोसायच्या ,रस्सा पार्ट्या करायच्या,हाडके चघळत संगीताच्या तालावर बेभान नाचायचे आणि भसाड्या आवाजात गाणी म्हणायची.
नव्या वर्षाचे हे असे स्वागत ?
सहस्र किरणांचे दोर जोडलेल्या प्रकाश रथावर आरूढ झालेले सूर्य देव पूर्वेच्या क्षितिजा वरून डौलाने नव्या वर्षात प्रवेश करतात.
आणि स्वागताला समोर काय ? खरकट्या पत्रावळ्या,चघळून टाकलेली हाडे आणि दारूच्या रिकाम्या असंख्य बाटल्या.
आठवडाभर आधीच पोलिस प्रशासनाने आणि नगर परिषदेने सादवून जाहीर केलेले असते की नशा करायची नाही,नशेत वाहने चालवायची नाहीत.
फटाक्यांची आतषबाजी करायची नाही.कोणत्याही रम्य ठिकाणी सहकुटुंब ,किंवा समूहाने नव वर्षाच्या स्वागताचा उत्सव साजरा करू शकता.
पण हे लक्षात कोण घेतो ? नशा करणे म्हणजेच नवीन वर्षाचे स्वागत करणे अशी थिल्लर विचार सरणी बाळगणे यासारखे दुर्दैव कोणते ?
नववर्षात पदार्पण करणारे सूर्यनारायण अशा स्वागताने दुःखी कष्टी होऊ नयेत म्हणून कांहीं जिद्दीचे शिवभक्त व समाजसेवक पुढे सरसावले.किरण पडायच्या आत कडाक्याच्या थंडीत या युवकांनी तलावाकाठच्या खरकट्या पत्रावळ्या व दारूच्या बाटल्यांचे ढीग गोळा केले.नगरपरिषदेच्या राखीव कचरा डेपो त नेवून टाकले. सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांनी त्यांच्या विधायक कार्याचे कौतुक केले.
नववर्ष साजरे करण्याचे निमित्त करून ज्यांनी नागरिकांच्या जिविताशी खेळ केला त्यांना एक साधी शिवी सुध्दा त्यांनी दिली नाही. सेवा संपल्यावर मनोमन शिवरायांना मुजरा करायला मात्र ते विसरले नाहीत. नव वर्षाचे खरे स्वागत त्यांच्या कृतीतून दिसून आले.पार्ट्या करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना ही एक मूक शिक्षाच होती.
शिवभक्त सर्जेराव भाट, ओंकार पोतदार यांनी या सेवेत पुढाकार घेतला.अन्य कांहीं स्वयंसेवी तरुण व नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचारी यांनी कचरा वाहतुकीसाठी मदत केली.
------------------------------------------


