कोल्हापूर न्यूज नेटवर्क
आव्हानांची चिंता करू नका. नवनवे आव्हान स्वीकारून आपले कर्तृत्व व करिअर घडवा. असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी केले.कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने आयोजित पत्रकार पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दैनिक सकाळचे संपादक निखील पंडीतराव होते.घोडावत इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी, बी न्यूजचे कार्यकारी संपादक ताज मुल्लांनी व संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे, संस्थापक उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी,सचिव सुरेश पाटील, खजाणीस सदानंद कुलकर्णी हे प्रमुख उपस्थित होते.अतिग्रे येथील संजय घोडावत विद्यापीठात हा कार्यक्रम संपन्न झाला.
कुलगुरू डॉ.डी. टी. शिर्के पुढे म्हणाले,कोणत्याही क्षेत्रात मागील पानावरून पुढे असे दिवस राहिले नाहीत. जागतिकीकरणामुळे आपण आपले राहिलो नाही, याचे भान ठेवून आपण सावध पाऊल टाकले पाहिजे. दूरगामी परिणामाचा विचार करून एखाद्या विषयावर सर्वांग दृष्टीने विचार करून बातमी दिली पाहिजे. बातमीची दुसरी बाजू ही मांडता आली पाहिजे. ए आय कृत्रिम बुद्धिमत्ता हा महत्त्वाचा भाग आहे याची जाणीवही असू द्या. पत्रकारितेमध्ये भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या विषयी दिशादर्शन करणे व त्यात तुमचे योगदान देणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
दैनिक सकाळचे संपादक निखिल पंडितराव म्हणाले ,सोशल मीडिया पेक्षा प्रिंट मीडियावर लोकांचा विश्वास आहे. ही विश्वासहार्यता जपण्यासाठी आपण जागरूकतेने कार्य केले पाहिजे. पत्रकार हे सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अनेक आव्हानांना सामोरे जाऊन पत्रकारिता करतात. अशा पत्रकारांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. पुरस्काराने आणखीन जबाबदारी वाढते.तंत्रज्ञान हे प्रिंट मीडियाला अतिशय पोषक आहे. काळा बरोबर आपण तंत्रज्ञान शिकून खमकी पत्रकारिता केली पाहिजे. सोशल मीडियाची माहिती खरी आहे की, खोटी आहे, हे तपासण्याची यंत्रणा उभी करावी लागते. पण प्रिंट मीडिया बाबत तसे होत नाही. विश्वासार्हता ही आपल्या लेखणीतून व्यक्त होते. समाजात विघातक घडत असेल तर त्यावर आपण प्रहार केला पाहिजे. आपली लेखणी ही सत्याच्या बाजूने असली पाहिजे. बातमीदार हा कोणत्याही गटाचा तटाचा किंवा पक्षाचा नसतो, तर तो आपल्या बातमीशी बांधील असतो हे महत्त्वाचे आहे असे त्यांनी सांगितले.
घोडावत इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी, ताज मुल्लानी यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी गुरुबाळ माळी यांना जीवनगौरव,संतोष मिठारी यांना जिल्हा उत्कृष्ट पत्रकार, अशोक पाटील यांना उत्कृष्ट जिल्हा पत्रकार, ज्ञानेश्वर साळुंखे यांना जिल्हा उत्कृष्ट पत्रकार ( इलेक्ट्रॉनिक मीडिया ), धनाजी गुरव यांना उत्कृष्ट सेवा, दीपक ऐतवडे यांना उत्कृष्ट छायाचित्रकार व शिवाजी भोरे यांना उत्कृष्ट सोशल मीडिया नेटवर्क असे पुरस्कार देण्यात आले. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील बारा तालुके व सीमा भागातील निपाणीसह १९ पत्रकारांना उत्कृष्ट तालुका पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
जागल्या या स्मरणिकेचे व निबंधायन या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.प्रा. रवींद्र पाटील यांनी स्वागत केले. संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांनी प्रास्ताविक केले.सचिव सुरेश पाटील यांनी अहवाल वाचन केले.पुनम चौगुले व अतुल मंडपे यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी खाजाणीस सदानंद कुलकर्णी कौन्सिल मेंबर दगडू माने, भास्कर चंदनशिवे, सुरेश कांबरे,निवास वरपे, दीपक मांगले, प्रा.अशोक पाटील, अवधूत आठवले, बाळासाहेब कवडे, कायदे सल्लागार ॲड. प्रशांत पाटील सल्लागार सदस्य बाळासाहेब जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश तिराळे,रवींद्र पाटील, सर्जेराव निर्मळे,सलीम खतीब, मिलींद बारवडे, प्रशांत तोडकर,नेताजी कांबरे, पी. एस. जाधव, पी.ए. पाटील आदी उपस्थित होते. संस्थापक उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी यांनी आभार मानले.
कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनच्या पुरस्कार वितरण प्रसंगी उपस्थित शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरूडॉ. डी. टी. शिर्के, दैनिक सकाळचे संपादक निखिल पंडितराव, ताज मुल्लाणी, सुधाकर निर्मळे व पुरस्कार प्राप्त पत्रकार








