कोल्हापूर न्यूज नेटवर्क
काेल्हापूरातील कोल्हापूर कॅन्सर सेंटर येथे ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने उत्साहात ध्वजवंदन करण्यात आले. याचबरोबर विविध स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
नानीबाई चिखलीचे निवृत्त आर्मी हवालदार महादेव इराप्पा कांबळे यांच्या प्रमुख हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना श्री. कांबळे म्हणाले, आज माझा तिसरा जन्म झाला आहे. तो म्हणजे पहिला आईने दिलेला, दुसरा आर्मीमध्ये २१ वर्षे सेवा करून सुखरूप घरी आलेला आणि तिसरा म्हणजे मला कॅन्सरचे निदान होऊन त्याच्यावर उपचारानंतर मी तुमच्यासमोर बोलू शकलो. मला कॅन्सरचे निदान झाल्यानंतर कोल्हापूर कॅन्सर सेंटर येथे मिळालेली सेवा उत्कृष्ट अशी होती. कोल्हापूर कॅन्सर सेंटर येथे रुग्णांना मिळत असलेली सेवा, आदरातिथ्य, अत्याधुनिक उपचार आणि येथील माहौल पाहून स्वर्गाची अनुभूती होते.
डॉ. योगेश अनप, डॉ. प्रसाद तानवडे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन डॉ. स्नेहल मालकर यांनी केले, तर आभार डॉ. सौ. रेश्मा पवार यांनी मानले. सर्वच वक्त्यांनी कॅन्सरबाबत सजग, जागरूक राहून प्रत्येकाने तपासणी करण्याचे आवाहन केले. कॅन्सर होण्यापूर्वीच प्रत्येक परिवाराने आपल्या कुटुंबातील सर्व सदस्याची योग्य ती तपासणी करणे जरुरी आहे. आपल्या इतर व्याधींबद्दल आपण जितके जागरूक असतो तितकीच दक्षता कॅन्सरबाबत घेतली तर प्रत्येक परिवार निरोगी राहील आणि आपला देश ही कॅन्सर मुक्त होईल.
दरम्यान, सेंटरअंतर्गत बॅडमिंटन, क्रिकेट, पोस्टर, रेसिपी अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्याच्या विजेत्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते पदक देऊन गौरविण्यात आले.
डॉ. संदीप पाटील, सुभाष वर्मा, डॉ. पराग वाटवे यांच्यासह कोल्हापूर कॅन्सर सेंटरचा कर्मचारी वर्ग, रुग्ण व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--------------------------------------------------
आमचा गौरव
२१ वर्षे देशसेवेसाठी दिलेले निवृत्त आर्मी हवालदार महादेव कांबळे यांच्या हस्ते आमच्या येथे ध्वजवंदन होणे कोल्हापूर सेंटरसाठी मोठी गौरवाची बाब तर आहेच शिवाय कॅन्सर या आजारावर त्यांच्यावर उपचार करायला संधी मिळणे, ही त्यांच्या ऋणातून उतराई केल्यासारखे आहे, असे मी आणि माझा परिवार मानते.
- डॉ. सौ. रेश्मा पवार
संचालिका कोल्हापूर कॅन्सर सेंटर
-----------------------------------------------------------
कोल्हापूर कॅन्सर सेंटर येथे रविवारी स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजवंदनप्रसंगी निवृत्त आर्मी हवालदार महादेव कांबळे, डॉ. संदीप पाटील, डॉ. सौ. रेश्मा पवार यांच्यासह मान्यवर.





