१९८८ ला माधुरीचा " तेजाब" प्रदर्शित झाला. " एक दोन तीन चार पाच छे सातवर माधुरी ने जो ठेका धरला त्याने तरुणाच्या काळजाचा ठोका चुकविला. आणि मराठमोळी माधुरी रातोरात सुपरस्टार झाली. यानंतर माधुरीचा " दिल" चर्चेत आला . पुढे माधुरीचा "बेटा" आला.
इतक्यात माधुरीच्या लग्नाची न्यूज आली. बॉलीवूड वर दोन दशके निर्विवाद राज्य करीत सहा फिल्मफेअर अवॉर्ड मिळवलेली पद्मश्री विभूषित भारतातील सर्वात टॉपची नायिका करियर सोडून संसाराला लागली. कुठल्याही क्रिकेटर किंवा बॉलीवूड अभिनेत्याच्या मागे न लागता सरळ अमेरिकेतील हृदयरोग तज्ञ डॉक्टर नेने यांच्या हृदयाचा ताबा घेत बार्शीच्या नेने कुटुंबाची माधुरी सून झाली. हा प्रॅक्टिकल विचार आजपर्यंत कुठल्याही अभिनेत्रीने केला नसेल . लग्नातले फोटो आणि स्टोरी हिराचंद नेमचंद लायब्ररीमध्ये फिल्मी मासिका मध्ये पहिली. अगदी भारतीय संस्कृतीला साजेल अशी वेशभूषा आणि परंपरा जपणाऱ्या अभिनेत्री बद्दल प्रेम नाही तर आदर वाटला.
लग्नानंतर माधुरी गायब झाली पुन्हा त्यावर कसली चर्चा किंवा न्यूज आली नाही. वाटलं माधुरीचा काळ संपला. परंतु पाच वर्षाच्या गॅप ने वैवाहिक जीवन एन्जॉय करून माधुरीने पुन्हा बॉलिवूडमध्ये एन्ट्री मारली. 2007 ला माधुरीचा "आजा नचले" हा चित्रपट रिलीज झाला.
आज माधुरी सोलापुरात येणार. चॅनेलवर बातमी पाहिली. शिवाजी सुरवसे यांना फोन केला. माधुरीला पाहायची इच्छा आहे पण पेशंट सोडून जाता येत नाही म्हणून दुःख व्यक्त केले. अकरा वाजलेपासून पब्लिक वेटिंग वर होते. नंतर २ वाजता शिवाजी सरांचा फोन आला 15 मिनिटात माधुरी येणार आहे येता का? मी पेशंट संपून कार्यक्रम स्थळी पोहोचलो. या बॉलीवूड कन्येला पाहण्यासाठी अख्खे सोलापूर लोटले होते. माधुरीला याची देही याची डोळा पाहण्याचा आनंद घेतला. साठीच्या उंबरठ्यावर असूनही तोच उत्साह तीच अदा आणि सळसळत तारुण्य अनुभवले. तिने मराठीत भाषण केलं. सोलापूरकरांची मन जिंकली. माधुरी बद्दलचा आदर आणखीनच दुणावला.
डॉ. प्रविण ननावरे
----------------------------------------------




