कर्तव्यतत्पर, रूबाबदार, निर्मोही हेरवाडे सर

Kolhapur news
By -

                                                                              

              


 रुबाबदार देहबोली तसेच रुबाबदार बोलणे. मात्र जराही गर्व नाही की मीपणा नाही. विद्यार्थी कसाही असो त्याला समजून जोपर्यंत सांगणार त्याला समजेल तोपर्यंत. सहकाऱ्यांशी असेच. त्यांच्याकडून अपेक्षित काम करून घेणार पण कधीच लादणार नाहीत. त्यांच्या रूबाबदारपणाचा उपयोग प्राचार्य म्हणून काम करताना खूप झाला. त्यांनी जवळपास वीस वर्षे प्राचार्य म्हणून काम केले. या काळात त्यांनी स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचा उपयोग संस्था उंचावण्यासाठी पुरेपूर केला. सरांचे आणखी एक वैशिष्ट्य वयाच्या ८८ वर्षापर्यंत शरीर आणि मन तंदरूस्त. कारही शेवटपर्यंत कोल्हापूर शहरातून चालवत होते. खूप समाधानी, कर्तव्यतत्पर, निर्मोही होते ते. हे व्यक्तिमत्त्व प्राचार्य श्रीधर शामराव हेरवाडे होय. यांचे नुकतेच (दि. २ जानेवारी २०२५) वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. यानिमित्त....                                                                                           

    हेरवाडेसर दुधगावचे (जि. सागली). सखारपा (जि. रत्नागिरी)  येथून त्यांची अध्यापनाची कारकीर्द सुरू झाली. तेथील एका शाळेत ते अध्यापक होते. नंतर ते रयत शिक्षण संस्थेत प्राध्यापक म्हणून रूजू झाले. मराठी हा हेरवाडेसरांचा अध्यापनाचा विषय. ते वर्गात जाताना अभ्यास करूनच जात. सर वेळ काटेकोरपणे पाळत असत. त्यांचे वक्तृत्व प्रभावी होते, वर्गातही आणि वक्ता म्हणूनही. खरतर प्राध्यापकांना  उत्तम वक्ता होण्याची खूप संधी असते. अभ्यासासाठी सुसज्ज ग्रंथालय असते, वेळ असतो आणि दररोज शिकवता शिकवता वक्तृत्व कौशल्य विकसित करण्यास वाव असतो. हेरवाडेसरांनी हे नेमकेपणाने साधलं. हेरवाडेसर काटेकोर, शिस्तीचे असले तरी गरीब आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांनी खूप समजावून घेतले. मलाही सरांचा असाच अनुभव आहे. मी वाणिज्य शाखेत शाहू काॅलेजमध्ये शिकत असताना मी कृ. गो. सुर्यवंशी यांनी लिहिलेले शाहू चरित्र वाचून काढलेल्या टिपणी सरांनी बारकाईने वाचल्या आणि मला मार्गदर्शन केले, कौतुक केले. त्यानंतर मी शाहू महाराजांविषयी काही लेख लिहिले. हेरवाडेसर अनेक वर्षे रयत शिक्षण संस्थेत प्राध्यापक होते. कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू काॅलेज येथून ते जयसिंगपूर काॅलेजमध्ये प्राचार्य पदावर कार्यरत झाले. तेथून हेरवाडेसर आण्णासो डांगे महाविद्यालय येथे प्राचार्य पदावर रूजू झाले. सर बाहुबली विद्यापीठाचे सहसचिवही होते. दक्षिण भारत जैन सभेचे मुखपत्र असलेल्या प्रगती आणि जिनविजय या पाक्षिकाचे तसेच सन्मती आणि रत्नत्रय या मासिकांचे संपादक म्हणूनही सरांनी काम पाहिले. हेरवाडेसरांनी विविध क्षेत्रात केलेल्या प्रभावी कामामुळे त्यांना अनेक संस्थांनी उच्च पदाच्या संधी दिल्या. या संधीच हेरवाडेसरांनी सोनं केलं. रणरागिणी ताराराणी व छत्रपती राजाराम महाराज यांचे चरित्र ग्रंथही हेरवाडेसरांनी सखोल अभ्यास करून लिहिली. सरांनी लोकप्रबोधनासाठी अनेक व्याख्याने दिली. शिक्षक व प्राध्यापकांसाठी शुध्दलेखनाचे वर्ग सरांनी घेतले. सरांना अनेक मान सन्मान प्राप्त झाले. शंभर वर्षापुर्वी सुरू केलेल्या दैनिक सत्यवादीचे संस्थापक, संपादक बाळासाहेब पाटील यांचे ते जावई होते.                   त्यांच्या तबियतेविषयी विचारले असता ते सांगायचे मी दूधगावचा आहे. त्यामुळे लहानपणापासून दूधसेवनामुळे माझी तबियत व स्मरणशक्ती उत्तम आहे.                                                                                                

सरांनी अनेकजणांना आर्थिक मदत केली आहे. ते भेटणाऱ्या प्रत्येकाची अस्थेवाईकपणे चौकशी करायचे. कुणाला पैशाची गरज असल्यास नि:संकोचपणे मागण्यास सांगायचे. सरांनी कधीच समाजसेवेचा आव आणला नाही पण ते शेवटपर्यंत समाजासाठी निरपेक्ष भावनेने कार्यरत राहिले.  हेरवाडेसरांची दीड वर्षात भेट झाली नाही ही एकच खंत माझ्या मनात कायम राहणार!                                                                                                           -  भारतभूषण  गिरी.                                            पर्यावरण कार्यकर्ता, लेखक, पत्रकार.