शिक्षकांचे पगार अद्याप न झाल्याचे समजताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेमधूनच अधिकाऱ्यांना फोन लावून विचारला जाब ; यापुढे असा प्रकार होणार नाही, अशी खबरदारी घेण्याचे दिले आश्वासन

Kolhapur news
By -

               


    पुणे :उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांचे जानेवारी महिन्यातील पगार झाले नसल्याचे सांगितले. त्यानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद सुरू असतानाच अर्थ विभागाच्या सचिवांना फोन करून शिक्षकांच्या पगारासाठी झालेल्या दिरंगाईबाबत विचारणा केली.


अजित पवार म्हणाले, शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत झाले पाहिजेत. त्याच्यात विलंब होण्याचे कोणतेही कारण असू नये. तरी देखील मी आता अधिकाऱ्यांना विचारतो. शिक्षकांचे पगार झाले नसतील, तर का झाले नाहीत? याबाबत विचारणा करतो आणि शिक्षकांचे पगार ताबडतोब कसे होतील, याबाबतची माहिती घेतो, असे सांगत असतानाचा त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन फिरवला.


  अजित पवार यांनी मंत्रालयातील सीपी  गुप्ता यांना फोन केला आणि शिक्षकांच्या चालू महिन्यातील पगाराबाबत विचारणा केली. आपण पगाराचे पैसे सगळ्या विभागांना उपलब्ध करून दिल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी अजित पवारांना सांगितले. प्रत्येक विभागात पगार देत असताना, काही त्रुटी किंवा संबंधित विभागाचा काही अंतर्गत प्रश्न निर्माण झाला असेल, असे एसीएस सांगितल्याचे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले. त्यामुळे वित्त विभागाने सर्वांचे पैसे दिल्याचे स्पष्ट झाले आहे. शिक्षकांच्या पगाराबाबत सीपींशी बोलणे झाले आहे, आता शिक्षण सचिवांशी देखील मी बोलतो. यापुढे असा प्रकार होणार नाही, अशी खबरदारी घेतली जाईल, असेही अजित पवार म्हणाले. 


          -------------------------------------