अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करताना प्रत्येकाने सजग होऊन अन्यायाविरुद्ध लढले पाहिजे - इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत

Kolhapur news
By -

 

                


                     



                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क


   संविधानाने आपल्याला दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करण्याबाबत लोकांनी सजग झाले पाहिजे ,बोलले पाहिजे , लिहीले पाहिजे, व्यक्त झाले पाहिजे ,अन्यायाविरुद्ध लढले पाहिजे, असे आवाहन इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी केले. 


   सत्यशोधक अण्णाभाऊ साठे अकादमीच्या वतीने कोल्हापुरात संविधान सन्मान परिषद आयोजित करण्यात आली होती , या परिषदेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. 


  या परिषदेचे मुख्य वक्ते डॉ.विजय काळेबाग म्हणाले, संविधानाचे या देशाला दिलेल्या मानवी मूल्यांची जोपासना करण्याचा आणि त्यांची पुन्हा नव्याने रुजवात करण्याचा हा कालखंड असून भारतामध्ये आजघडीला संविधानातील बंधुता जोपासण्याची आणि वृद्धिंगत करण्यासाठी समाजाने कार्य करण्याचीही आवश्यकता आहे .  


    डॉ. शरद गायकवाड यांच्या संकल्पनेतून सत्यशोधक अण्णाभाऊ साठे अकादमीच्या वतीने ही संविधान सन्मान परिषद आयोजित करण्यात आली होती. 


  डॉ. शरद गायकवाड यांनी गेल्या महिनाभरात देशात ठिकठिकाणी झालेल्या दलितांवरील, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा आढावा घेत संवैधानिक मूल्ये आणि नैतिकता व मानवतावादाची गरज यावेळी व्यक्त केली. 


   शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ.आलोक जत्राटकर  म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान हे भारतातील प्रत्येक नागरिकाच्या जगण्याचे, अस्तित्वाचे कारण आणि प्रयोजनआहे. संविधानातील बंधुत्वाची, भारतीयत्वाची भावना प्रत्येकाच्या मनात बिंबविण्यासाठी काम करण्याची गरज आहे. 


यावेळी इंद्रजित सावंत यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हा बहुजन माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेचे नवनिर्वाचित चेअरमन दिलीप वायदंडे यांचा सत्कार करण्यात आला. पंडित चोपडे यांनी सूत्रसंचालन केले. 








      --------------------------------------------