शिक्षकांच्या सद्य परिस्थितीला महाविकास आघाडीचे सरकारच जबाबदार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : शिक्षक आंदोलनासाठी येऊन चिखलामध्ये बसत आहेत हे बरोबर नाही - शरद पवार

Kolhapur news
By -

 

           


          मुंबई : विनाअनुदानित शिक्षकांनी गेल्या चार दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन सुरू केल्यानंतर महायुती सरकार आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आझाद मैदानात जाऊन आंदोलनकर्त्या शिक्षकांची भेट घेत त्यांना पाठिंबा दर्शवला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देत, सध्याच्या परिस्थितीला महाविकास आघाडी सरकारच जबाबदार असल्याचा ठपका ठेवला आहे.


सरकारकडून कोणताही पुढाकार घेतलेला नाही- सतेज पाटील


विधानपरिषदेत काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनावर प्रश्न उपस्थित करत सरकारला जाब विचारला. त्यांनी म्हटले की, आझाद मैदानात शिक्षक चार दिवसांपासून आंदोलन करत आहेत. टप्पा अनुदानाचा निर्णय सरकारने घेतला असला तरी तो केवळ आचारसंहितेच्या अंमलबजावणी पूर्वीपर्यंतच मर्यादित आहे, असा संशय निर्माण झाला आहे. गिरीश महाजन आंदोलकांची भेट घेऊन बैठक घेण्याचे आश्वासन देऊन गेले, मात्र त्यानंतरही सरकारकडून कोणताही पुढाकार घेतलेला नाही. आंदोलक शिक्षक सकाळपासून सरकारच्या बोलावण्याची वाट पाहत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढे येऊन त्यांच्याशी चर्चा करावी, अशी मागणी सतेज पाटील यांनी केली.


शिक्षकांच्या या परिस्थितीला सतेज पाटील तुमचे सरकार जबाबदार - मुख्यमंत्री


सतेज पाटलांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिक्षकांच्या या परिस्थितीला सतेज पाटील तुमचे सरकार जबाबदार आहे. तुम्ही सर्वांना सरसकट विनाअनुदान संस्थांना परवानगी दिली. त्यानंतर कायम शब्द तुम्ही काढला. अनुदानाचा पहिला टप्पा आमच्या सरकारने दिला. तुमचे महाविकास आघाडी सरकार असताना तुम्ही काय केले? 


आघाडी सरकार असताना तुम्ही काय केले? काहीच केले नाही. आम्हीच टप्पा अनुदान देत आहोत. परंतु तुम्ही आझाद मैदानात जाऊन राजकारण करत आहात. हे राजकारण करणे योग्य नाही. मी गृहमंत्री आहे, कोण काय करत हे आम्हाला दिसते. आम्ही त्यांच्याबाबत निर्णय घेणार आहोत. आम्ही त्यांना आज बोलावले देखील आहे.

           

शिक्षक आंदोलनासाठी येऊन चिखलामध्ये बसत आहेत हे बरोबर नाही - शरद पवार


शिक्षकांची भेट घेतल्यानंतर शरद पवार म्हणाले, शिक्षकांच्या महत्वाच्या मागण्या आहेत. त्यासाठी त्यांना संघर्ष करण्याची वेळ येत आहे. शिक्षक आंदोलनासाठी येऊन चिखलामध्ये बसत आहेत हे बरोबर नाही. त्यांनी पुढे सांगितले की तरतूद न करण्यात आलेला आदेश हा कचरा टाकण्यासारखाच आहे. ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांवर अशा पद्धतीने संघर्ष करण्याची वेळ येऊ देऊ नका. शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी खांद्याला खांदा लाऊन आपण काम करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. 


            ---------------------------