कोल्हापूर न्यूज नेटवर्क
एसटीच्या कोल्हापूर विभागाला श्रीक्षेत्र आदमापूर येथे दर महिन्याच्या अमावस्येला भरणाऱ्या यात्रेमधून वर्षभरात ( ८अमावस्या यात्रा) सुमारे १ कोटी ३० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
श्री.क्षेत्र आदमापुर येथे संत बाळूमामा यांची दर महिन्याच्या अमावस्येला मोठी यात्रा भरते. या यात्रेला पश्चिम व उत्तर महाराष्ट्र व दक्षिण कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात. एसटीच्या कोल्हापूर विभागाकडून भाविक प्रवाशांच्या सेवेसाठी यात्रा काळात सलग दोन दिवस सरासरी ४० जादा बसेस लावल्या जातात. या बसच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात झालेल्या अमावस्या यात्रेतून एसटीला १ कोटी २९ लाख ५३ हजार रुपये इतके उत्पन्न मिळाले असून या काळात एसटीच्या तब्बल ४ हजार फेऱ्या मधून सुमारे २
लाख २५ हजार ५०० प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला आहे.
श्रीक्षेत्र आदमापुर येथे भरणाऱ्या अमावस्या यात्रेला दिवसेंदिवस भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. लोक आपल्या खाजगी वाहनातून, रेल्वेने तसेच एसटीने या यात्रेला येत असतात. अमावस्येच्या आदल्या दिवशी आणि भर अमावस्येला श्री . संत बाळूमामांचे दर्शन घेऊन ते परतीचा प्रवास करतात. एसटीने या २ दिवसात कोल्हापूर - आदमापूर आणि आदमापुर - निपाणी या मार्गावर आपल्या एसटीच्या फेऱ्या सुरू केल्या आहेत. अर्थात ज्येष्ठ नागरिक व महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलततर ७५ वर्षाच्या वरील ज्येष्ठांना १०० टक्के तिकीट दरात सवलत असल्यामुळे गेल्या काही वर्षात आदमापूर यात्रेतून एस टी महामंडळाला चांगले उत्पन्न मिळू लागले आहे. भविष्यात देखील दर अमावस्या यात्रेला प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्यासाठी एसटी कटिबद्ध असेल असे प्रतिपादन कोल्हापूर विभागाचे विभाग नियंत्रक कांनतोडे यांनी केले आहे.
कोल्हापूर -आदमापुर-मुरगुड मार्गावर दररोज ५० फेऱ्या
एसटी महामंडळ सकाळी ६ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत कोल्हापूर - आदमापुर मार्गावर दररोज ५० फेऱ्या (ये-जा) चालवते. तसेच निपाणी - आदमापुर मार्गावर दर ३० मिनिटांनी बस फेऱ्या चालविल्या जातात. याचा फायदा संत बाळूमामांच्या दर्शनाला येणाऱ्या लाखो भाविक - प्रवाशांना होतो.
------------------------


