कोल्हापूर न्यूज नेटवर्क
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार पहिली ते आठवीचे वर्ग शिकवणाऱ्या शिक्षकांना टीईटी परीक्षा पास होणे अनिवार्य असल्याचे म्हटले आहे. दोन वर्षात टीईटी परीक्षा पास न झाल्यास शिक्षकांना राजीनामा द्यावा अथवा सेवामुक्त करण्या बाबतचे मत सर्वोच्च न्यायालय नोंदवलेले आहे. तसेच ज्या शिक्षकांची सेवा पाच वर्षापेक्षा कमी राहिली आहे, अशा शिक्षकांना टीईटी लागू राहणार नाही असेही स्पष्ट केले आहे. शिवाय शिक्षकांना पदवीधर, विषय शिक्षक किंवा मुख्याध्यापक पदोन्नतीसाठी मात्र टीईटी अनिवार्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील एम एल जी हायस्कूल येथे मुख्याध्यापक व शिक्षकांचे खुले चर्चासत्र आयोजित केले होते.
कोल्हापूर सर्किट बेंचचे वकील ओंकार घाटगे यांनी, टीईटी अनिवार्य करणेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातील महत्त्वाची निरीक्षणे, या निर्णयाचा शिक्षकांवर होणारा परिणाम, या विषयावर सविस्तर माहिती दिली. तसेच शिक्षकांनी विचारलेल्या अनेक प्रश्रांना उत्तरे दिली.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सिंधुदुर्ग देवगडचे गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
फेब्रुवारी 2013 पासून शिक्षक पात्रतेसंदर्भात टीईटी लागू केली आहे . पूर्वलक्षी प्रभावाने शिक्षकांना टीईटी अनिवार्य करणे चुकीचे असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
--------------------