कोल्हापूर न्यूज नेटवर्क
"बाळूमामाच्या नावानं चांगभलं "च्या जयघोषात, भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत ,श्रीक्षेत्र आदमापुर ता.भुदरगड येथे दीपावली पाडव्या (दि.२२ आक्टो.) दिवशी बाळूमामांची बकरी पूजनाचा व बुजविण्याचा (पळविण्याचा) कार्यक्रम मोठ्या उत्साहात ,धार्मिक वातावरणात आणि भाविकांच्या अफाट गर्दीत संपन्न झाला.
बाळूमामांनी सुरू केलेल्या बकरी पूजन व बकरी बुजवणे या कार्यक्रमास महाराष्ट्र ,कर्नाटक, गोवा राज्यातून हजारो भाविक उपस्थित होते.मुक्या प्राणिमात्रावर प्रेम करा असा जणू संदेश श्री संत बाळूमामांनी यातून दिला आहे.
प्रारंभी बाळूमामा मंदिरातून देवस्थानचे अध्यक्ष धैर्यशीलराजे भोसले यांच्या हस्ते ढोल कैताळ च्या वाद्यात भंडारा आणण्यात आला. मरगुबाई मंदिर परिसरात बाळूमामांच्या बकऱ्यांच्या लेंड्यांची रास करण्यात आली. या राशीचे विधिवत पूजन करण्यात आले. विविध प्रकारच्या फुलांनी रास सजविण्यात आली होती. सभोवती गवळण्या घालण्यात आल्या होत्या .प्रातिनिधिक स्वरूपात मामांच्या मेंढ्यांच्या कळपातील कांहीं बकरी बुजवण्यासाठी( पळवणे ) आणण्यात आली. तरीही ती संख्या हजारात होती. सुवासिनींनी बकऱ्यांचे विधिवत पूजन केले.
राशीवर बाळूमामांच्या भंडाऱ्याची उधळण करण्यात आली .यावेळी दूध ऊतू जाण्याच्या कार्यक्रमाकडे सगळ्या भाविकांच्या नजरा लागून राहील्या होत्या .ही प्रथा बाळूमामांनी सुरू केली होती. ज्या दिशेला हे दूध उतू जाईल त्या दिशेला पाऊस, पीकपाणी उत्तम राहते अशी श्रद्धा भाविकांच्यात आहे आणि आजपर्यंत तसे घडतही आले आहे अशी त्यांची भावना आहे. यावर्षी उत्तर बाजूला दूध बाहेर गेल्याने हा विभाग सुजलाम सुफलाम होणार हे निश्चित भाकित या प्रथेतून समोर आले आहे . या प्रसंगी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला .
विविध जाती धर्मातील भक्तांनी आणलेला दिवाळीचा फराळ यावेळी भक्तांना वाटप करण्यात आला. सर्वधर्मसमभावाची शिकवण देणारी आदमापुर ची दिवाळी पाडवा यात्रा उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाली.महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमास ट्रस्टचे कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे, संदीप मगदूम , दत्तात्रय पाटील, दिनकरराव कांबळे , यशवंतराव पाटील, दिलीप पाटील संभाजी पाटील, विजय गुरव, इंद्रजीत खर्डेकर,रणवीरराजे भोसले राजनंदिनी भोसले, भिकाजी शिंणगारे, भिकाजी चव्हाण विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------------

