कोल्हापूर न्यूज नेटवर्क
पश्चिम महाराष्ट्रातील साखर पट्ट्यात कारखाने सुरू झाले की मराठवाडा,विदर्भ मधून हजारो ऊसतोड कामगार अक्षरश: पाठीवर बिऱ्हाड घेऊन येऊ लागतात.हातावर पोट असलेल्या या कामगारांच्या टोळ्या कारखाना परिसरात व जागोजागी दाखल झाल्या.ऊसतोड सुरू झाली आणि गडगडाटासह सकाळ संध्याकाळ कोसळणाऱ्या पावसामुळे ऊसतोड थांबवावी लागली. कोयता घेऊन उसाच्या शेतात शिरले की पाठोपाठ पाऊस हजर.
शेतातल्या चरीतून साचलेले पाणी ,सरपटणाऱ्या जीवांची भीती यामुळे ऊसतोड कामगाराचे हाल कुत्रे खाईना असे झाले आहेत.पावसामुळे या कामगारांना ट्रॅक्टर खाली आसरा शोधावा लागत आहे.उघड्यावरचे बिऱ्हाड भिजून चिंब झालेले असते.
सांगोला,बीड,हिंगोली,परभणी,नंदुरबार, नांदेड,शिरूर, धारूर, गेवराई, पाटोदा, आष्टी,परळी, अशा दुष्काळी पट्ट्यातून हे कामगार पश्चिम महाराष्ट्र भागात ऊसतोडीसाठी दाखल होतात. यंदा त्यांना ओल्या दुष्काळाला तोंड द्यावे लागले.इकडे आड तिकडे विहीर अशी त्यांची विचित्र अवस्था झाली आहे.त्यांचे तर हाल झालेच पण ऊस शेतकऱ्यांची सुद्धा चिंता वाढली आहे.ऊस वेळेत तुटला पाहिजे व वेळेत कारखान्यावर पोचला पाहिजे.यंदा साखर हंगाम थोडा उशिरा सुरू झाला असला तरी अत्याधुनिक मशिनरी मुळे समस्या निवारण झाले आहे.
पाऊस थांबला नाही तर ऊसतोड कामगार व उत्पादक दोन्ही अडचणीत येणार आहेत.
----------------------------

