कोल्हापूर न्यूज / वि.रा.भोसले
डॉ.संपदा मुंडे या तरुण डॉक्टर मुलीने आत्महत्या केली.आत्महत्येचे कारण तिने तळहातावर लिहून ठेवलं होतं.एका पोलिस फौजदाराने तिच्यावर बलात्कार केला होता.राहत्या घरातल्या घरमालकाच्या पोरांने देखील तिच्यावर अत्याचार केला होता.
तिने कोणाकडे तरी तक्रार केली सुद्धा असेल.कोणीही दाद दिली नसेल.तिने मग दाद मागण्यासाठी देवाकडेच जायचे ठरवले असेल.ती गेली.तळहातावर संदेश लिहून ठेऊन गेली. ज्यांनी रक्षण करायचं असतं तोच तिच्या शरीराचा भक्षक ठरला.एक हलकट पोलिस फौजदार.सगळ्या पोलिस खात्याला आणि खातेदार सरकारला सुद्धा बदनाम करणारा तो संदेश होता.
मी या राज्यात असहाय्य आहे का ? माझ्या अब्रूवर घाला घालणाऱ्याला कोणी विचारणारे नाही का ?
राजे पाहताय ना ! तुमचा महाराष्ट्र नेमका चाललाय कोठे ? नैतिक संपदा हरवून गेली आहे.
संपदा म्हणजे समृद्धी.नैतिकतेची समृद्धी महाराष्ट्र हरवून बसलाय.डॉ.संपदा मुंडे बरोबर तिनेही आत्महत्या केली आहे असे वाटते.राजे तेंव्हा तुम्हीं छत्रपतीही झाला नव्हता .मर्द मावळ्यांच्या साक्षीने रायरेश्वरावर रक्ताचा भिषेक करून स्वराज्याची शपथ घेतली होती .हर हर महादेव ची घोषणा सह्याद्रीच्या पहाडांना थडकून दऱ्या खोऱ्यात घुमू लागली.
पहिला न्याय.
रांझ्याच्या पाटलाने एका महिलेवर अत्याचार केला तेव्हा तुम्ही त्याचे हात पाय तोडून त्याचा चौरंग केला.गावाच्या सीमेवर टांगला.
दुसरा न्याय.
कल्याणच्या सुभेदाराची रूपवती सून जेव्हां तुमच्या समोर आणली गेली तेंव्हा तिला आपण मातेचा दर्जा दिला. खणा नारळाने ओटी भरून तिला तिच्या सन्मानाने परत पाठवून दिलेत.
म्हणून तुमचा प्रत्येक मावळा मिशीवर ताव देऊन अभिमानाने म्हणू लागला.
"आमचं राजं आमचं दैवत हाईत."
हातावर पंचप्राण घेऊन ते स्वराज्यासाठी लढले .तुमचा तान्या,बाजी,शिवा काशीद स्वतः साठी कधी जगलेच नाहीत .ते हिंदवी स्वराज्यासाठी जगले, लढले आणि गेले..
ते स्वराज्य आज महाराष्ट्राचं रूप घेऊन उभं आहे असं आम्हीं मानतो.
इथं स्त्री सुरक्षित नाही.
एक विख्यात महिला डॉक्टर म्हणतात.
टीव्ही सुरू करायला आणि वृत्तपत्र उघडायला सुद्धा भिती वाटू लागली आहे.
आज काय पहायला मिळेल ,काय वाचायला मिळेल हे सांगता येणार नाही.
आत्महत्या,खून, मारामारी ,चोऱ्या,दरोडे, जाळपोळ , दगडफेक , छेडछाड, बलात्कार, शिव्या,टीका ,टोमणे, धमक्या,मोर्चे, आंदोलने,उपोषणे, आणि ती निरर्थक भाषणे.सारं कांहीं खुर्चीसाठी.तुमच्या तीन हजार हेरांचे प्रमुख असलेले बहिर्जी नाईक तुम्हांला सगळं कांहीं सांगतीलच.आपल्या चरणी नतमस्तक होऊन हीच प्रार्थना आहे की...
तुमच्या नावांने सुरू असलेल्या या महाराष्ट्राच्या कारभाराकडे लक्ष असू द्या. तुमच्या नुसत्या घोषणांनी आमच्या अंगावर रोमांच उभे राहतात.
महाराष्ट्राची नैतिक संपदा सुध्दा अशीच पुन्हा उभी राहुदे.
---------------------------
