सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाच्या घरी जाऊन...

Kolhapur news
By -

 

      


नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी देशभरातून संताप व्यक्त होत आहे. सरन्यायाधीशांवर बुट फेकणाऱ्या वकिलाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी आज एक अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. नीलेश लंके यांनी थेट वकील राकेश किशोर यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी वकिलाला संविधानाची प्रत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो भेट देत त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली.


सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान वकील राकेश किशोर यांनी भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी राकेश किशोर यांच्याविरुद्ध बंगळुरूमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयीन सभागृहात घडलेली ही घटना अभूतपूर्व मानली जात असून, तिचा निषेध विविध स्तरावरून व्यक्त केला जात आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राज्यातील विविध ठिकाणी या घटनेविरोधात आंदोलन केले. त्यानंतर आज नीलेश लंके यांनी राकेश किशोर यांची दिल्ली येथे भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलत असताना भेटीमागचा उद्देश सांगितला.


 नीलेश लंके म्हणाले.... 


 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचे संविधान निर्माण केले. संविधानाचे संरक्षण करण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाची आहे. भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याबाबत जो प्रकार घडला, तो एका व्यक्तीचा अवमान नसून संपूर्ण देशाचा अवमान होता. जे कृत्य घडले, त्याचा शांततेच्या मार्गाने निषेध करण्यासाठी मी आंबेडकरांचा फोटो आणि संविधानाची प्रत घेऊन येथे आलो आहे.


राकेश किशोर यांच्याकडून घडलेली घटना संकुचित आणि मनुवादी विचारांमधून घडलेली घटना आहे. संविधानाचा त्यांना कुठेतरी त्यांना विसर पडला आहे. त्याची त्यांना पुन्हा जाणीव करून देण्यासाठी मी इथे आलो आहे, असे नीलेश लंके यांनी स्पष्ट केले.


               ----------------------