कोल्हापूर न्यूज नेटवर्क
विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने सर्वसमावेशक तयारी करून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) आणि जिल्हा मुख्याध्यापक संघांच्या संयुक्त विद्यमाने 'बोर्ड परीक्षेचा राजमार्ग: सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे' या अनोख्या मालिकेतील दुसऱ्या ऑनलाइन कार्यक्रमाचे दिनांक ४ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले.
विभागीय मंडळाकडून शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी तयार करण्यात आलेल्या वार्षिक नियोजन पुस्तकेस अनुसरून या ऑनलाईन कार्यक्रमाचा दुसरा भाग प्रक्षेपित करण्यात आला. शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी राज्यातील हा एक महत्त्वपूर्ण आणि वेगळा प्रयोग असून, बोर्डाच्या तयारीसाठी विविध विषयांवर टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन करण्याची ही नवी दिशा आहे.
या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण विभागीय मंडळाच्या YouTube चॅनलवर करण्यात आले, ज्यामुळे विभागातील हजारो विद्यार्थी, शिक्षक व पालकांना एकाच वेळी या उपक्रमाचा लाभ देण्यात येत आहे. कोल्हापूर शैक्षणिक विभागातील पाचही माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि मुख्याध्यापक संघ 'कॉपीमुक्तीसाठी' एकवटले आहेत, हे या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. परीक्षा कामकाजात आणि निकालात गुणात्मक बदल घडवून आणण्यासाठी या कार्यक्रमातून सर्वसमावेशक प्रयत्न होताना दिसत आहेत. या कार्यक्रमाचे सर्व भाग युट्युब वर कायमस्वरूपी ठेवण्यात येणार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेश क्षीरसागर (अध्यक्ष, कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळ) होते आणि त्यांनीच या उपक्रमाचा दूरगामी हेतू स्पष्ट केला. या ऑनलाइन मंचावर कोल्हापूर विभागीय सचिव सुभाष चौगुले, कोकण विभागीय सचिव पुनिता गुरव, कोल्हापूर विभागीय सहसचिव बसवेश्वर किल्लेदार, कोकण व कोल्हापूर सहाय्यक सचिव गजानन उकिरडे यांच्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि पाचही जिल्ह्यांच्या मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.
आहार व आरोग्याची काळजी याबाबत मार्गदर्शन करताना डॉ. अनिल लाहोटी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी किमान कुरेशी सात ते आठ तास झोप घेणे आवश्यक आहे, नाहक जागरण नको. अर्धा ते एक तास मनसोक्त खेळ किंवा छंद यामध्ये रमले पाहिजे. दिवसभर पुरेसे पाणी आणि संतुलित आहार महत्त्वाचा आहे. जंक फूड टाळावे.
करिअर मार्गदर्शन याबाबत मार्गदर्शन करताना एकनाथ चौगुले व विनायक कांबळे यांनी सांगितले की, मानसशास्त्रीय कसोट्यांच्या आधारे करिअर निश्चिती करता येते. विद्यार्थ्यांनी उपलब्ध असलेल्या संधी आपली आवड व क्षमता ओळखून निवडाव्यात. पारंपारिक अभ्यासक्रमाशिवाय अनेक संधी सर्व शाखांसाठी उपलब्ध आहेत. दहावी व बारावीनंतर करिअर करण्यासाठी उपलब्ध असलेल्या संधीची सविस्तर माहिती त्यांनी दिली.
परीक्षार्थी यांनी मोबाईलचा मर्यादित वापर करण्याबाबत संदीप सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले, ते म्हणाले की, केवळ शैक्षणिक ॲप व शैक्षणिक व्हिडिओ यांचा वापर करण्यापुरता परीक्षार्थी यांनी मोबाईल वापरला पाहिजे. मोबाईलच्या अतिवापराने एक डिजिटल संकट उभे राहिले आहे. वरवरचे ज्ञान, एकाग्रतेचा अभाव आणि वेळेचा अपव्यय असे मोबाईलचे शैक्षणिक दुष्परिणाम आहेत. आभार मुख्याध्यापक संघाचे राज्य उपाध्यक्ष सचिन नलावडे यांनी मानले.
--------------------------------

