बाळुमामांच्या यात्रेत लालपरीची भरारी : एसटीला प्रवासी सेवेतून २७ लाखांची विक्रमी कमाई

Kolhapur news
By -

 


                 


           कोल्हापूर न्यूज नेटवर्क  

   

         नवीन वर्षाच्या शुभारंभी श्री क्षेत्र आदमापूर येथे पार पडलेल्या संतश्रेष्ठ बाळुमामांच्या पहिल्या अमावस्या यात्रेत एसटी महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने पुन्हा एकदा सेवाभाव आणि कार्यक्षमतेचा अनोखा संगम घडवला आहे. या यात्राकाळात तब्बल ४०,९६६ भाविक-प्रवाशांची सुरक्षित व सुलभ वाहतूक करून महामंडळाने २७ लाख २ हजार ५५७ रुपये इतके घवघवीत उत्पन्न मिळविले आहे.


दर महिन्याच्या अमावस्येला आदमापूर येथे लाखो भाविकांची मांदियाळी जमते. महाराष्ट्रासह दक्षिण कर्नाटकातून येणाऱ्या श्रद्धाळूंच्या सोयीसाठी कोल्हापूर विभागाने यंदाही उत्कृष्ट नियोजन केले. कोल्हापूर–आदमापूर आणि आदमापूर–निपाणी या मार्गांवर दर पंधरा मिनिटाला एक बस या नियोजनानुसार तब्बल ५७ बसेसच्या माध्यमातून ७१२ फेऱ्या यशस्वीपणे पार पाडण्यात आल्या.


प्रति किलोमीटर ८२ रुपये या दराने केलेल्या या विशेष वाहतुकीतून एसटीने उच्चांकी महसूल नोंदविला. चालक–वाहकांची कर्तव्यनिष्ठा, अधिकाऱ्यांचे सुनियोजित मार्गदर्शन आणि प्रवाशांचा विश्वास यामुळे ही मोहीम निर्विघ्नपणे यशस्वी ठरली. हजारो भाविकांना वेळेत आणि सुरक्षितपणे दर्शन घडवून आणण्याचे सामाजिक दायित्व पार पाडताना महामंडळाच्या तिजोरीतही भर पडली


या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोल्हापूर विभागाचे विभाग नियंत्रक अभय देशमुख यांनी सर्व प्रवाशांचे आभार मानत कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले. लोकसेवेच्या भावनेतून कार्यरत असलेल्या एसटीने पुन्हा एकदा सिद्ध केले की, श्रद्धा आणि सेवा यांचा खरा दुवा म्हणजेच – आपली लाडकी लालपरी !


                -----------------------