गुरुकुल शिक्षण संस्थेचे कार्य शिक्षण व्यवस्थेसाठी प्रेरणादायी - माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत

Kolhapur news
By -

   

              


          कोल्हापूर न्यूज नेटवर्क  


        प्राचीन गुरुकुल शिक्षण पद्धतीप्रमाणे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य आदर्श गुरुकुल शिक्षण संस्था प्रभावीपणे करत असून, आजच्या शिक्षण व्यवस्थेसाठी ती प्रेरणादायी मार्गदर्शक ठरत आहे. त्यामुळे पालकांनी निश्चिंत राहावे, असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी (माध्यमिक विभाग), जिल्हा परिषद कोल्हापूर, सौ. सुवर्णा सावंत यांनी केले.


त्या आदर्श गुरुकुल शिक्षण संस्थेतील ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल, पेठ वडगाव येथे आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, गुणवत्तेसोबतच कला, क्रीडा, सांस्कृतिक व जीवनोपयोगी गुण विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचे कार्य ही संस्था सातत्याने करत आहे. म्हणूनच ‘आदर्श गुरुकुल’ हे नाव राज्यात खऱ्या अर्थाने आदर्श ठरत आहे.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. डी. एस. घुगरे होते. ते म्हणाले, “पालकांनी ज्या विश्वासाने आपली मुले आमच्या ताब्यात दिली आहेत, तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आम्ही नेहमीच कसोशीने प्रयत्न करतो. विद्यार्थ्यांमधील ऊर्जेला योग्य दिशा व गती देण्याचे काम शाळा करत असून, आज पालकांचा काळजाचा तुकडा आमचा झाला आहे,” असे सांगत त्यांनी शाळेच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला.


प्रमुख पाहुणे डॉ. प्रणव थोरात म्हणाले की, “वीस वर्षांनंतर पुन्हा या शाळेचा परिसर पाहताना आजही तीच ऊर्जा व तीच शक्ती अनुभवास मिळत आहे. ज्या मायेने आई आपल्या मुलाची काळजी घेते, त्याच मायेने या संकुलामध्ये विद्यार्थ्यांची काळजी घेतली जाते. विद्यार्थी मित्रांनो, या संस्थेत राबवण्यात येणाऱ्या प्रत्येक उपक्रमात मनापासून व धैर्याने सहभागी व्हा, यश तुमचेच आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रकांत माने यांनी आपल्या भाषणात सांगितले की, विद्यार्थी हा केवळ परीक्षार्थी नसून तो सर्वगुणसंपन्न बनावा, यासाठी पालकांनी अशा आदर्श संस्थेची निवड केली आहे, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. जीवनप्रवासात पहिले चुकीचे पाऊल अपयशाकडे घेऊन जाते, तर प्रत्येक योग्य निर्णय यशाकडे नेतो, असे मार्गदर्शन त्यांनी केले.


यावेळी विद्यार्थ्यांनी लोकगीत, चित्रपट गीते, दांडीनृत्य, कोळीगीत, महाराष्ट्र दर्शन, लोकनृत्य, समूह गायन, गुजराती नृत्य अशा सुमारे ३२ प्रकारच्या कलागुणांचे बहारदार सादरीकरण केले. यावेळी आदर्श विद्यार्थी म्हणून पृथ्वीराज पाटील यांची सत्कार करण्यात आला. तसेच कुस्ती, जंपरोप, योगा, रोलबॉल व लाठीकाठी या क्रीडा प्रकारांची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.


कार्यक्रमात कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैज्ञानिक व सामाजिक क्षेत्रात राष्ट्रीय, राज्य व जिल्हास्तरावर उल्लेखनीय यश संपादन केलेल्या शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.


यावेळी शिक्षण अधिकारी (माध्यमिक), जि. प. कोल्हापूर सौ. सुवर्णा सावंत,प्रादेशिक परिवहन अधिकारी कोल्हापूर चंद्रकांत माने,एम.बी.बी.एस.,एम.डी.(फुप्फुसरोग तज्ज्ञ) डॉ. प्रणव थोरातकार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव व मुख्याध्यापिका सौ. एम. डी.घुगरे, विश्वस्त डॉ. शिवराज घुगरे, ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक व्ही. एस. डोईजड, पर्यवेक्षक एस. जी. जाधव, प्रशासक एस. ए. पाटील, ज्युनिअर कॉलेज विभागप्रमुख प्राचार्य एस. एस. चित्ते, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक एम. एस.चौगुले, प्रायमरी विभागाचे मुख्याध्यापक एस. एस. गिरीगोसावी, अधीक्षक ए. डी. झरेकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख अमर इंगवले आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. एम. बाबर व  ए.एन. इंगवले यांनी केले, तर आभार प्रदर्शन व्ही. एस. डोईजड यांनी केले.


           ------------------------