कोल्हापूरची जिल्हा परिषद महायुतीने जिंकली असली तरी काँग्रेसने सुद्धा कमाल केली.बंटी नी एकाकी झुंज दिली.

Kolhapur news
By -

 

                    





                कोल्हापूर न्यूज /  वि.रा. भोसले


कोल्हापूर महानगरपालिके नंतर जिल्हा परिषद निवडणुका सुद्धा झाल्या. भाजप, राष्ट्रवादी (सुनेत्रा) आणि शिवसेना (शिंदे ) या पक्षांच्या महायुतीने दोन्ही ठिकाणी बहुमत मिळविले. बंटी उर्फ सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस ने सुद्धा कमाल केली आहे. महानगरपालिकेत 35 नगरसेवक निवडून आणले. आणखी सहा आले असते तर महापौर त्यांचाच होता. राज्य पातळीवरील नेत्यांनी नुसती हजेरी लावली असेल नसेल तरीही सतेज पाटील यांनी जी एकाकी झुंज दिली ती कौतुकास्पद होती.


    जिद्द आणि संघटन यांचे दुसरे नाव म्हणजे बंटी पाटील असे म्हणायला हरकत नाही. पश्चिम महाराष्ट्रात डी वाय पाटील ग्रुपचे राजकीय आणि शैक्षणिक साम्राज्य आहे. बंटीनी स्वतःचे छोटे राजकीय साम्राज्य निश्चित निर्माण केले आहे.


    रणनीतिमध्ये माहीर असलेल्या ना. मुश्रीफ यांना सुद्धा एकट्याला जमले नाही ते बंटी पाटील यांनी करून दाखवले आहे. मुन्ना आणि बंटी हे खरे तर पारंपारिक राजकीय स्पर्धक होत. दोघांचेही संघटन कौशल्य वादातीत आहे. ईर्षा अफलातून आहे.बिंदू चौकातील एका सभेत शरद पवार एकदा म्हणून गेले होते. 

कोण मुन्ना,त्याची काय कुवत?

थोडक्यात  वस्तादांनी त्यांना हलक्यात घेतले होते. कोल्हापूरचा महापौर ठरवण्याची ताकद या युवा नेत्यांनी निर्माण केली आहे.जिल्हा परिषदेत राष्टवादीचे 20 तर काँग्रेस चे 15 उमेदवार विजयी झाले आहेत.राष्टवादीच्या पाठोपाठ  काँग्रेस आहे. अजितदादा यांच्या अपघाती निधनाने सहानुभूतीच्या लाटेचा फायदा राष्ट्रवादीला निश्चित झालेला आहे. यांना ओट्यात घ्या, त्यांना ओट्यात घ्या. हीच दादांना श्रद्धांजली असं ना. मुश्रीफ सभां मधून सांगत होते..पूर्वी काँग्रेस मध्ये असलेल्या पी एन पाटील यांचे वारस सुद्धा राष्टवादीत डेरे दाखल झाले आहेत. ना. मुश्रीफ राजकीय जुळणी  करण्यात नेहमीच  अग्रेसर असतात. निष्ठा आणि सन्मान वगैरे तेथे गौण असते.


  आमदार सतेज पाटील एकटे लढले. माजी खासदार संजय मंडलिक एकटे लढले. राजकारणात जिद्द आणि युद्ध यांची युती व्हावी लागते. एकटे पणामुळे सत्तेची माला गळ्यात पडेल न पडेल पण जनतेच्या शाब्बासकीची एक थाप पाठीवर पडल्याशिवाय राहणार नाही.


     मतदार खरंच खुप  चोखंदळ झालेत. त्यातही महिला अधिक सबल झाल्या आहेत.आजपर्यंत  मंडईतली भाजी निवडण्यात त्याचे कौशल्य वाया जात होते. आता उमेदवार निवडण्यात त्या  पारंगत झाल्या आहेत.  पदर खोचून जेंव्हा भारतीय महिला मैदानात उतरतात  तेंव्हा त्या वर्ल्ड कप सुद्धा नाचवत आणतात हे त्यांनी दाखवून दिले आहे. जिल्ह्याचे राजकारण त्यांच्या दृष्टीने भाकरी परतण्याईतके सोपे झाले आहे.


   जुळवाजुळवीच्या राजकारणाला  हे एक आव्हान ठरणार आहे.शिवसेना व  कॉग्रेस च्या काठावरच्या यशातून हाच संदेश मिळतो आहे.


         -------------------------