कोल्हापूर न्यूज नेटवर्क
करवीर तालुक्यातील विकासवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट स्टेडियमला स्वर्गीय अजित पवार यांचं नाव देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या झालेल्या बैठकीत यासंदर्भात ठराव मंजूर करण्यात आला.
यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या स्टेडियमसाठी 12 हेक्टर 76 आर जमीन हस्तांतरित करण्यास मंजुरी देण्यात आली होती. प्रस्तावित जागेपेक्षा अधिक जागा उपलब्ध करून देण्याबाबत अजित पवार यांनी सूचनेनुसार पाठपुरावा केल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे त्यांच्या योगदानाच्या स्मरणार्थ स्टेडियमला त्यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सामन्यांचा मार्ग मोकळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत एकूण 19 निर्णयांना मंजुरी देण्यात आली होती. त्यामध्ये विकासवाडी येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारणीचा निर्णय महत्त्वाचा ठरला. या प्रकल्पामुळे कोल्हापूरमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने आयोजित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
क्रीडाप्रेमींकडून स्वागत
कोल्हापूरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम व्हावे, ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. 1980 च्या दशकात छत्रपती शिवाजी स्टेडियमवर भारत विरुद्ध वेस्ट इंडीज सामना रंगला होता. त्यानंतर कोल्हापुरात एकही आंतरराष्ट्रीय सामना झालेला नाही. आवश्यक सुविधा आणि दर्जेदार पायाभूत सुविधा नसल्याने सामने येथे आयोजित होऊ शकले नव्हते.
विकासवाडी येथे आधुनिक स्टेडियम उभारले गेल्यानंतर कोल्हापूरकरांना आंतरराष्ट्रीय सामने प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळणार आहे. या निर्णयाचे कोल्हापुरातील लोकप्रतिनिधी, क्रीडाप्रेमी नागरिक आणि क्रीडा संघटनांकडून स्वागत करण्यात आले आहे.
दरम्यान, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनुपस्थितीत पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यांच्या कार्याची आठवण काढण्यात आली. सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थिती लावली होती.
-----------------------

