लोकशाहीने महिलांच्या सन्मानासाठी त्यांना पदे दिली. नवरेशाहीने ती हिरावून घेऊ नयेत.

Kolhapur news
By -

 



       कोल्हापूर न्यूज /  वि रा भोसले


    गणा : तुका,आमच्या गावची सरपंच हिराबाई आहे 

.

  तुका. असून काय करायची. घरात चूल फुकत बसलीया न्हवं.


    गणा :  असं कसं म्हणतोस. गावाचा कारभार चालवायचा हाय तिला. घर चालवणारी स्त्री गाव सुद्धा चालवू शकते म्हणून लोकशाही सरकारने त्यांना जबाबदारीची पदे देऊन त्यांचा सन्मान करायचा ठरवलंय


 रामा : ते खरं. पण नवऱ्याने तशी संधी दिली तर न्हवं. पंचायतीत त्योच जाऊन बसतोय. बिडी फुकत सगळ्यांसनी दम देत असतोय. लोकांनी त्येलाच सलाम ठोकायचा म्हणं.


गणा : काय सांगतोस. सरपंचाच्या खुर्चीवर बसतोय?


 रामा :  त्या खुर्चीवर कशाला बसल,? बाजूला दुसरी खुर्ची टाकून बसतोय. सरपंचाच्या खुर्ची पेक्षा भारी खुर्ची असतीय त्येची.कारकून, तलाठी, शिपाई  तिथली सगळी कामं करत्यात.


 गणा :हे एकदम चुकीचे आहे. लोकशाहीचा अपमान नवरे शाही कडून होतोय.


  रामा :  अगदी तसंच.


     गणा, तुका आणि रामा यांच्यातला हा नाट्यमय संवाद ग्रामीण भागात अनेक ठिकाणी ऐकायला मिळतोय.


  महिलांना सन्मान देण्यासाठी लोकशाही गणराज्यात खास पदे आरक्षित केली गेली. सरपंच, नगराध्यक्षा, महापौर, आमदार, खासदार आणि राष्ट्रपती सुद्धा.


  या वरिष्ठ पदावर महिलांनी आपली योग्यता सिद्ध केली आहे. कोल्हापूर, पुणे, मुंबई सारख्या महानगरपालिकांचे महापौर पद महिलांनी भूषविले आहे. त्यांचा वकूब पण चांगला आहे. मोठ्या शहरातल्या नगरसेविका पण कर्तबगार असतात. तरीही त्यांचा नवरा, सासरा, बाप, भाऊ, दीर इत्यादींची लुडबुड सुरू असतेच.हे सगळेजण त्या खुर्चीचे पाय आणि हात असल्या सारखे वागत असतात. हा कसला महिला सन्मान ? जे नवरे किंवा कुटुंबीय खरोखर आपल्या दुर्गेला खरा सन्मान देऊ इच्छितात ते तिकडे फिरकत सुद्धा नाहीत. उलट घरातूनच तिला भरपूर  प्रोत्साहन देतात. तिचे पावलो पावली कौतुक करतात. याला म्हणायचे महिला सन्मान.


      भारत हा जगातील एकमेव देश आहे की महिलांना सत्तेत एवढा मोठा वाटा देतो. त्यांच्यातील दुर्गेला, लक्ष्मीला, चन्नमाला, ताराराणी ला जागवतो. लोकशाहीची  जननी म्हणवून घेणाऱ्या इंग्लंडने महिलांना मतदानाचा अधिकार भारताच्या नंतर दिलाय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या दृष्ट्या विचारवंताची ही जगाला दिलेली मौलिक देण आहे. आपण ती जपली पाहिजे.लोकशाहीने महिलांना दिलेला  हा सन्मान नवरेशाहीने हिरावून घेऊ नये.


                    ----------------------------