कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शिल्पा खोत

Kolhapur news
By -

 

             


            कोल्हापूर न्यूज नेटवर्क   


      कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार पक्षाच्या सदस्या शिल्पा शशिकांत खोत तर उपाध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाचे मुडशिंगी मतदारसंघातील सदस्य तानाजी पाटील यांची नावे निश्चित केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. 


जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड मंगळवारी, १७ मार्च २०२६ रोजी होत आहे. अध्यक्षपदावरुन भाजप आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू होती. दोन्ही पक्षाकडून पहिल्यांदा आमचा अध्यक्ष असा दावा केला जात होता. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या आदल्या दिवशी अर्थात सोमवारी, सोळा मार्च रोजी सगळे सदस्य पन्हाळा येथे पाठविण्यात आले आहेत. मंगळवारी सकाळी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची नावे कळविली जातील असे ठरले. अध्यक्षपदासाठी कागल तालुक्यातील सेनापती कापशी मतदारसंघातील राष्ट्रवादीकडून निवडून आलेल्या शिल्पा शशिकांत खोत यांचे नाव निश्चित केल्याचे वृत्त आहे. उपाध्यक्षपदी तानाजी पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. पाटील हे भाजपकडून गडमुडशिंगी मतदारसंघातून निवडून आले आहेत.


दरम्यान अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी मंगळवारी सकाळी दहा ते बारा या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे याच्या अध्यक्षतेखाली दुपारी दोन वाजता अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडी होणार आहेत. या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 


       ----------------------------------