जयसिंगराव पवार सर इतिहास संशोधनातील बाप माणूस !

Kolhapur news
By -

          



         कोल्हापूर न्यूज नेटवर्क


मराठा इतिहास आणि विशेषतः शाहू महाराजांच्या संशोधनासाठी संपूर्ण जीवन समर्पित केलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार सर होय. पवार सरांनी अध्यापन करत करत मराठा इतिहासाचा सखोल अभ्यास केला. अभ्यासाचा आधार घेऊन लिखाण केले. निवृत्तीनंतर शाहू संशोधन केंद्रात फक्त १ रूपया मानधनावर संचालक म्हणून अखेरपर्यंत काम केले. आज  (२६ मार्च, २०२६) पवार सरांचे निधन झाले. यानिमित्त आदरांजली म्हणून त्यांच्याविषयी कृतज्ञतेचे दोन शब्द...!


पवार सरांनी श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात अध्यापन केले. पवार सर पहिल्यापासून काटेकोर. सर वर्गावर शिकवताना अभ्यास करूनच शिकवायचे. सरांचा लहानपणापासून आवडीचा इतिहास विषय. अध्यापनाचाही विषयही इतिहास. यामुळे सर अभ्यास करताना जितके रंगून जायचे तितकेच ते शिकवतानाही. यामुळे त्यांचा प्रत्येक तास इतका प्रभावी व्हायचा की विद्यार्थ्यांना घटना प्रत्यक्ष पाहतोय, असे वाटायचे. अभ्यासक्रमाचा अभ्यास करत असताना त्यांच्या हे लक्षात आले की मराठ्यांच्या मांडलेल्या इतिहासात अनेक त्रुटी आहेत. अनेक प्रश्न आहेत. काहीतरी गोंधळ आहे. म्हणून सरांनी मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास सुरू केला. सखोल संशोधन सुरू केले. हे संशोधन करत असताना त्यांनी महाराणी ताराराणी, राजाराम महाराज, शाहू महाराज अशा चरित्र ग्रंथांची मालिकाच पुस्तकरूपाने मांडली. त्यांनी जितकी पुस्तकं लिहिली त्यातील लिखाण पुस्तक रूपाने सिध्द करून दाखविले. यामुळे खरा इतिहास पुढे आला.


पवार सरांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचाही सखोल अभ्यास करून त्यांच्या विषयी पसरविलेले चुकीचे कथानक पूर्णपणे खोडून काढले. त्यांनी शाहू महाराजांचे चरित्र लिहून १४ भारतीय भाषेत तर ६ परकीय भाषेत भाषांतर करून जगभर शाहू महाराजांचे कार्य पसरविण्याचे फार मोठं काम केले.


पवार सरांनी अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेची स्थापना केली. शहाजी महाविद्यालयातून निवृत्त झाल्यानंतर सरांनी शिवाजी विद्यापीठाच्या शाहू संशोधन केंद्राचे संचालक म्हणून काम सुरू केले. या केंद्रात अखेर पर्यंत ते संशोधन करत राहिले. शाहू महाराजांच्या विषयी प्रेम आणि कृतज्ञता म्हणून सरांनी फक्त १ रूपया मानधनावर शाहू संशोधन केंद्रात काम केले. 


सरांना महाविद्यालयात भेटायला गेले तर ते एकतर वर्गात अध्यापन करताना दिसायचे  किंवा ग्रंथालयात वाचत किंवा टिपणे काढत बसलेले दिसायचे.  त्यांनी घरातही समृद्ध ग्रंथालय तयार केलं आहे. सर भेटायला जाणाऱ्या प्रत्येकाशी फार आत्मियतेने बोलायचे. त्यांची भेटही घरातील किंवा शहाजी महाविद्यालयातील ग्रंथालयातच व्हायची.


पवार सर वर्गात शिकवताना किंवा व्याख्यान देताना भान हारपून इतिहास सांगायचे. जसजसं त्यांचे व्याख्यान रंगवायचे तसं त्यांच्या कपाळावर तुषार जमा व्हायचे. सरांचा प्रचंड अभ्यास पण कधीही ते विषयांतर करायचे नाहीत. सर संगतवार आणि जोषात इतिहास मांडायचे. सर इतिहासातील चुकीचा मुद्दा नेमके पुरावे देत खोडून काढायचे. सर इतिहास संशोधनातील बाप माणूसच होते.


     -  भारतभूषण केशव गिरी

         कदमवाडी, कोल्हापूर.

         मो. नं. ९८८१७०३२२७

         दि. २६/३/२०२६.


     ----------------------------


पूर्ण