राज्यात लॉकडाऊन लागणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Kolhapur news
By -

        

     

 मुंबई :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशात निर्माण झालेल्या इंधन टंचाईमुळे लॉकडाऊन लागणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्राने सद्यस्थितीवर भाष्य करताना लॉकडाऊन लागणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे जे लोक अशी अफवा पसरवत आहेत, त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल. या प्रकरणी खोटी माहिती फेसबुक, एक्स किंवा इतर कोणत्याही समाज माध्यमावर टाकली किंवा व्हॉट्सएपच्या माध्यमातून फॉरवर्ड केली तरी तो गुन्हा ठरेल, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी नरहरी झिरवाळ व अशोक खरात प्रकरणातही चौकशी अंती ठोस कारवाई करण्याची ग्वाही दिली.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी काही वेळापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. त्यात त्यांनी पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानत राज्यातील वेगवेगळ्या प्रश्नांवर भाष्य केले. ते म्हणाले, आखाती देशांतील युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर वाढले आहे. यामुळे पेट्रोल - डिझेलचे दर वाढण्याची शक्यता होती. पण इंधन दरवाढीचा फटका सामान्य ग्राहकांना बसू नये म्हणून पेट्रोल - डिझेलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपयांनी कमी करण्यात आले आहे. त्यामुळे आता कच्च्या तेलाच्या वाढलेल्या भावाचा परिणाम सरकारी तेल कंपन्या व भारत सरकार सहन करणार आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांना आता अधिकच्या दरात पेट्रोल - डिझेल घ्यावे लागणार नाही.


मी याविषयी भारत सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. विशेषतः ज्यावेळी आपल्या आजूबाजूंच्या देशांमध्ये जवळपास शटडाऊनची स्थिती ओढावली आहे. पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आदी देशांतील लोकांनी गॅस व पेट्रोलच्या तुटवड्यामुळे जवळपास कार्यालये व संस्था बंद केल्या आहेत. अशावेळी भारताने अतिशय उत्तम मॅनेजमेंट करून आपल्याकडे पेट्रोल-डिझेलची कोणताही तुटवडा होऊ दिला नाही. घरगुती गॅसची कोणतीही कमतरता होऊ दिली नाही.