कोल्हापुरात प्रयोगशाळा सहाय्यक व प्रयोगशाळा परिचय यांची कार्यशाळा उत्साहात संपन्न.

Kolhapur news
By -

 

            


                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क   

 

माध्यमिक शिक्षण विभाग जि.प.कोल्हापूर व माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर तसेच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ शाखा कोल्हापूर जिल्ह्याच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय प्रयोगशाळा सहाय्यक व प्रयोगशाळा परिचर उद्बोधन कार्यशाळा 22 व 23 एप्रिल 2026 रोजी मुख्याध्यापक संघ कोल्हापूर येथे उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेत कोल्हापूर जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक मधील कार्यरत प्रयोगशाळा सहाय्यक व परिचर 250 जन उपस्थित होते. सदर कार्यशाळेत प्रमुख पाहुण्यांनी प्रयोगशाळा शिक्षणाच्या बळकटीकरणावर विशेष भर दिला.


      शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर म्हणाले की, “विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी प्रयोगशाळा हा शिक्षणाचा आत्मा आहे. प्रयोगशाळा सहाय्यक व परिचर यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून त्यांच्या कार्यक्षमतेमुळे शिक्षणाची गुणवत्ता उंचावते.” असे मत व्यक्त केले.


   कोल्हापूर व कोकण विभाग अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी “आजच्या युगात अनुभवाधारित शिक्षणाला मोठे महत्त्व असून सक्षम प्रयोगशाळा ही नवोन्मेषाची पायाभरणी ठरते,” असे मत व्यक्त केले.


    शिक्षण उपसंचालक सौ. प्रभावती कोळेकर यांनी “प्रयोगशाळा सुरक्षितता, शिस्तबद्ध नोंदवही व आधुनिक पद्धती यांचा अवलंब केल्यास शिक्षणाची गुणवत्ता निश्चित वाढेल,” असे स्पष्ट केले.


     माध्यमिक वेतन पथक अधीक्षक उदय सरनाईक यांनी “प्रयोगशाळेतील कामकाजात अचूकता, नियोजन व जबाबदारी ही यशाची गुरुकिल्ली आहे,” असे मार्गदर्शन केले.


कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ अध्यक्ष एस. डी.लाड यांनी “प्रयोगशाळा कर्मचारी हे शिक्षण व्यवस्थेतील महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या कौशल्यवृद्धीसाठी अशा कार्यशाळा आवश्यक आहेत,” असे नमूद केले.


तसेच उपशिक्षणाधिकारी रवींद्र चौगुले, शिक्षक नेते दादा लाड आणि शिक्षण उपसंचालक कार्यालयातील उपनिरीक्षक बालाजी यमुनवाड यांनी प्रयोगशाळा व्यवस्थापन, नोंदवही प्रणाली व शिस्त यावर मार्गदर्शन केले.


उद्बोधनासाठी उपस्थित डॉ. प्रा. सी. एम. बागणे व सुधीर आमनगी यांनी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून प्रयोग अधिक परिणामकारक कसे बनवता येतील तसेच प्रयोग करताना घ्यावयाची काळजी प्रयोगशाळेचे नियम यावर सविस्तर मार्गदर्शन केले.


या सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनामुळे कार्यशाळेला शैक्षणिक दृष्टिकोनातून विशेष उंची वाढली. सदर कार्यशाळा संघटनेचे राज्य अध्यक्ष श्री भरत जगताप जिल्हा अध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष जगदीश शिर्के, कार्याध्यक्ष संतोष देसाई, सचिव अशोक आरेकर व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.




जिल्हास्तरीय प्रयोगशाळा सहाय्यक व प्रयोगशाळा परिचर उद्बोधन कार्यशाळेत बोलतांना शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर बोलतांना


           ------------------------








                -----------------------------------------