कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मळगे हायस्कूलच्या एस.एस. सी. च्या 1987 च्या वर्गाचा स्नेह मेळा नुकताच संपन्न झाला.जवळ 40 वर्षानंतर होणाऱ्या या मेळाव्या ची तयारी सहा महिने सुरु होती. मुख्य म्हणजे त्यावेळचे शिक्षक असतील का आणि असले तर येऊ शकतील का येथून सुरुवात होती.त्यावेळचे वर्ग मित्र सुद्धा विखूरलेले होते.कोण मुंबई, पुणे, सारख्या मेट्रो सिटीत स्थायिक झालेले तर कोणी परदेशात व्यवसायात गुंतलेले होते.कोणी इंजिनीअर, कंत्राटदार मोठे उद्योजक,महानगर पाकीकेतले अधिकारी तर कोणी कोकणात मुख्याध्यापक, प्राध्यापक, वकील, लेखक, हॉटेल चालक, पार्लर चालक, तर कोणी शेतकरी. सर्वांना निरोप गेले, तारीख ठरली.उन्हात फिरणारी पाखरं विसाव्या साठी पिंपळाच्या झाडा खाली जमावीत तसे हे सर्व वर्ग मित्र केनवडे फाट्यावरील एका हॉटेलच्या प्रशस्त हॉल मध्ये जमा झाले. ते हॉटेल सुद्धा एका वर्ग मित्राचेच.
जुने सर भेटणार याचा एक आंनद आणि त्यांच्या समोर नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त करता येईल म्हणून दूरदूरवरून रविवारच्या सुट्टी दिवशी हे सर्वजण एकत्र आले.त्यावेळचे एच एम सर व्ही आर भोसले, सौ. एम व्ही भोसले, व्ही वाय खतकर, बी एस खामकर हे शिक्षक सुद्धा आले. काही वर्ग मित्र मैत्रिणी शिक्षक हयात नव्हते . त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून मेळाव्याला सुरुवात झाली.
आंनद, कृतज्ञता,दुःख यांचा तो अनोखा संगम होता. त्यांची मुलं मुली सुना मोठमोठ्ठया पदावर नोकरीला होते. शहरात 2/3 बी एच के फ्लॅट, बंगले, कार सगळं वैभव मागे टाकून एकमेकांची गळाभेट घेण्यासाठी ते सर्व एकत्र आले होते. शिक्षण सह संचालक डॉ. कमळकर यांनी प्रास्ताविक आणि सूत्र संचालन केले. प्रत्येकाने आपली व आपल्या कुटुंबा ची ओळख करून दिली. सुखदुःखांच्या अश्रूंना वाट करून दिली.आण्णासाहेब डांगे कॉलेज च्या मराठी विभागाचे प्रमुख असलेले वर्गमित्र प्रा. ए. एस पाटील यांच्या वि. स. खांडेकरांचे यांचे ललित लेखन या पुस्तकाचे प्रकाशन सुद्धा या सोहळ्यात करण्यात आले.
प्रतिभा संपन्न लेखक, प्रशासकीय अधिकारी, मोठे उद्योजक, शेतकरी,आणि त्यांचे गुरुजन यांनी एकत्र येऊन साजरा केलेला हा आठवणींचा सोहळा ह्रदयाच्या देव्हाऱ्यात पुजून ठेवावा असा झाला.
----------------------



