सृष्टी करे ची 'सुवर्ण' पदकासह आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड तर अंजली वेताळला 'रौप्य' पदक!

Kolhapur news
By -

 


              





                   कोल्हापूर न्यूज नेटवर्क   

   


मुरगुडच्या मातीतील कुस्तीचा वारसा आज पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर सुवर्णतेजाने झळाळून निघाला. छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झालेल्या '१७ वर्षांखालील राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत' लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय (SAI) कुस्ती संकुल, मुरगुड च्या दोन वाघिणींनी प्रतिस्पर्ध्यांना आसमान दाखवत देदीप्यमान यश संपादन केले.


      सुवर्ण पदकासह सृष्टीची आशियाई स्पर्धेत धडक


संकुलाची पैलवान सृष्टी शिवाजी करे हिने आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर ६५ किलो वजनगटात सुवर्ण पदक पटकावले. या सुवर्णमयी कामगिरीमुळे सृष्टीची आता व्हिएतनाम येथे होणाऱ्या 'आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी' भारतीय संघात निवड झाली आहे. तिच्या या यशामुळे मुरगुडच्या कुस्ती क्षेत्राची मान आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावली आहे.


     अंजली वेताळची रौप्य झुंज


तसेच, ६१ किलो वजनगटात पैलवान अंजली संतोष वेताळ हिने अटीतटीच्या लढतीत रौप्य पदक जिंकून संकुलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या दोन्ही खेळाडूंनी आपल्या कष्टाचे आणि जिद्दीचे चीज करून दाखवले आहे.

      

 यशाचे शिल्पकार


या ऐतिहासिक यशामागे आंतरराष्ट्रीय कुस्ती मार्गदर्शक पै. दादासो लवटे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या शिस्तबद्ध प्रशिक्षणामुळेच मुरगुडच्या या खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर आपला दबदबा निर्माण केला आहे.


कौतुकाचा वर्षाव


विजेत्या खेळाडूंचे संकुलाचे कुटुंब प्रमुख खासदार संजय (दादा) मंडलिक आणि कार्याध्यक्ष वीरेंद्र भैय्या मंडलिक यांनी मनापासून अभिनंदन केले. "ग्रामीण भागातील मुलींनी जागतिक स्तरावर झेप घेणे ही अभिमानाची गोष्ट असून, संकुल त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे," अशा शब्दांत त्यांनी खेळाडूंचे कौतुक केले.


मुरगुड शहरासह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून सृष्टी, अंजली आणि मार्गदर्शक लवटे सर व दयानंद खतकर सर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


पुढील वाटचालीसाठी आणि व्हिएतनाम येथील स्पर्धेसाठी पै. सृष्टी करे हिला खूप खूप शुभेच्छा! 



               ************************