कोल्हापूर न्यूज नेटवर्क
जवळपास सहा वर्षांनंतर कोल्हापूर महानगरपालिकेत नवीन सभागृह अस्तित्वात आले. नवे कारभारी आले आणि नवे अधिकारीही आले. महिन्याभरातच कारभारी आणि अधिकाऱ्यांनी अतिक्रमणाची कारवाई हाती घेतली. यासाठी कारभारी आणि अधिकाऱ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! मात्र ही कारवाई सर्वंकश व्हावी, ही अपेक्षा!
अतिक्रमण म्हणजे एखाद्या जागेवर, मालमत्तेवर किंवा हद्दीवर बेकायदेशीरपणे कब्जा करणे, घुसखोरी करणे होय.
जागेचं अतिक्रमण - सरकारी किंवा दुसऱ्याच्या मालकीच्या जमिनीवर परवानगीशिवाय घर, दुकान, झोपडी बांधणे.
उदा: फूटपाथवरचे अतिक्रमण, नदीपात्रातले, ओढ्या-नाल्यातील अतिक्रमण. थोडक्यात हक्क नसताना केलेला कब्जा किंवा हस्तक्षेप म्हणजे अतिक्रमण होय.
वेळच्या वेळी कारवाई केली जात नसल्याने अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात वाढतात. जितकी अतिक्रमण शहरात वाढत आहेत तितकीच ग्रामीण भागातही वाढत आहेत. मात्र प्रथमदर्शनी रस्त्याच्या व मुख्य रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या टपऱ्या नजरेत येतात. अलिकडच्या काळात सर्व प्रकारची अतिक्रमणं फार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.
चारचाकी किंवा दुचाकी वाहन खरेदी करणं अलिकडच्या काळात वाहनं फार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. मात्र वाहनांनी ठिकठिकाणी केलेलं अतिक्रमण दुर्लक्षीत केलं जात आहे. या वाहनांचा वाहतुकीस मोठा अडथळा ठरतो.
वास्तविक ज्यांच्याकडे पुरेसे भांडवल नाही किंवा दुकानात किंवा हाॅटेलात धंदा होत नाही असे लोक रस्त्यावर येऊन व्यवसाय करतात. ही लोकं पोटासाठी अतिक्रमण करतात. यांचे अतिक्रमण काढलं जातं आणि ते ठिकाण चारचाकीचं पार्किंग होते. वाहतूक सुरक्षित होण्यासाठी टपऱ्या हाटविल्या जातात, पादचाऱ्यांसाठी फूटपाथ मोकळे केले जातात परत तेथे कोणाचेच अतिक्रमण होऊ नये याची खबरदारी घेण्याचे काम स्थानिक स्वराज्य संस्थेचे आहे मात्र कर्मचारी हे काम प्रामाणिकपणे करत नाहीत. वेळच्या वेळी कारवाई केली तर अतिक्रमण होणारही नाही. एका टपरीला हटविणे सहज शक्य आहे मात्र जास्त संख्येने टपऱ्या हटविणे अवघड होते.
बेकायदेशीर बांधकामे हा एक मोठा अतिक्रमणाचा विषय झाला आहे. अगदी उद्दामपणे बेकायदेशीर बांधकामे बांधली जातात याकडेही कर्मचारी हेतूपुरस्सर दुर्लक्ष करतात. मोठी बांधकामे झाली की कायद्याची लढाई सुरू होते.
अलिकडच्या काळात वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. यापैकी बहुतांश वाहनं घरासमोरील किंवा व्यवसाय -कार्यालयासमोर सार्वजनिक जागेत लावली जातात. बांधकाम करताना पार्किंग दाखवतात मात्र पार्किंग न करता वाहनं रस्त्यावर लावली जातात. किंवा एका चारचाकीच्या पार्किंगची सोय असताना ज्यादा वाहने घेऊन ती सार्वजनिक जागेत किंवा दुसऱ्याच्या जागेत लावली जातात. ही समस्या दिवसेंदिवस अधिक तीव्र बनत आहे. काही ठिकाणी पंधरा फुटी रस्ता असूनही दुतर्फा वाहनं लावल्यामुळे पायवाटेपुरतीच जागा राहते. यावरही स्थानिक स्वराज्य संस्थांनी कारवाई करण्यास आता सुरूवात केली पाहिजे.
नद्या - नाल्यांच्या पात्रात अतिक्रमण करून ती संकुचित केली जातात. यामुळे त्या ठिकाणी पावसाचे पाणी तुंबते. अशा अतिक्रमणामुळे कोल्हापूर शहरातील नागरिकांना दर वर्षी पुराच्या पाण्याशी सामना करावा लागतो. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांनी पूररेषेतील विविध स्वरूपात असलेली अतिक्रमणे हटविण्याची मोहीम जोरदार राबवावी. यावर्षी पाऊस कमी पडणार म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांनी व जिल्हाधिकारी यांनी बिल्कुल गाफिल राहू नये.
अतिक्रमणामुळे अनेक समस्या निर्माण होतात. म्हणूनच अतिक्रमण निर्मूलन मोहीम सर्व प्रकारची अतिक्रमणं हटविण्यासाठी नियमितपणे केली पाहिजे, तरच ही मोहीम सर्वंकश होइल.
- भारतभूषण गिरी
---------------------

