कोल्हापूर न्यूज नेटवर्क
पदार्थ विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशातील सर्वोत्कृष्ट संशोधकांच्या यादीत कोल्हापूरच्या डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठातील दोन संशोधकांनी 'टॉप टेन'मध्ये स्थान मिळवले आहे. रिसर्च डॉट कॉम आंतरराष्ट्रीय शैक्षणिक व संशोधन मूल्यमापन संस्थेने जाहीर केलेल्या यादीत सेंटर फॉर इंटरडीसीप्लेनरी स्टडीजचे अधिष्ठाता डॉ. सी. डी. लोखंडे तिसरे तर संशोधन संचालक डॉ. प्रमोद एस. पाटील यांनी आठवे स्थान मिळवले आहे.
रिसर्च डॉट कॉमच्या अहवालानुसार देशातील अव्वल संशोधकांची निवड डी इंडेक्स, संशोधनपत्रांची गुणवत्ता, संदर्भ, आणि संशोधन क्षेत्रातील प्रभाव या निकषांवर करण्यात आली. डॉ. चंद्रकांत डी. लोखंडे यांचा डी. इंडेक्स, १०८ असून त्यांच्या संशोधन कार्याला ४१ हजार ७६४ हून अधिक संदर्भ प्राप्त झाले आहेत. जागतिक क्रमवारीत त्यांचा ७२५ वा क्रमांक आहे. डॉ. प्रमोद एस. पाटील यांचा डी. इंडेक्स ९१ असून त्यांच्या संशोधनाला २९ हजार १६० हून अधिक संदर्भ मिळाले आहेत. जागतिक स्तरावर त्यांना १५५४ वा क्रमांक मिळाला आहे. त्याचबरोबर विद्यापीठाचे संशोधक डॉ. उमाकांत पाटील यांनीही यादीत १८५ वे स्थान मिळवले आहे.
त्यांच्या यशाबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आ. सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी अभिनंदन केले.
देशातील २६३ संशोधकांची यादी तयार
रिसर्च डॉट कॉमने यंदाच्या मानांकनासाठी विविध आंतरराष्ट्रीय डेटाबेसमधील माहितीचा आधार घेतला. देशातील २६३ मटेरियल्स सायन्स संशोधकांचा अभ्यास करून ही यादी तयार करण्यात आली. संशोधकांच्या शैक्षणिक योगदानासोबतच त्यांच्या संशोधनाचा समाज आणि विज्ञान क्षेत्रावर झालेला प्रभावही विचारात घेण्यात आला.
**************************

