कोल्हापूर न्यूज नेटवर्क
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी हे गाव. महाराष्ट्रातील हजारो गावांसारखंच. पण अचानक हे गाव चर्चेला आलं. तेही एका चांगल्या कारणासाठी, ते म्हणजे शाळा. एरव्ही शाळा विषय चर्चा करण्यासारखा ठेवला आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत असताना वाबळेवाडीने मात्र हा विषय देशपातळीवर नेला. या शाळेला काचेच्या भिंती आहेत. कुठे बसावं असा काही नियम नाही. मुलांना दुपारी झोपू दिलं जातं. या शाळेतील मुलं जपानीज, फ्रेंच, इंग्लिश खाडखाड बोलतात. हे सगळं बघून लोकांना हरखून गेल्यासारखं झालं. महत्त्वाचे म्हणजे ही जिल्हा परिषदेची शाळा आहे हे ऐकल्यावर अर्ध्या लोकांना तर विश्वासच बसत नव्हता. पण हे करून दाखवलं वारे गुरुजींनी. ज्या शाळेत एक अंकी पटसंख्या होती तिथे तीन अंकी पटसंख्या तर झालीच पण आज हजारो विद्यार्थी वाबळेवाडीच्या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून प्रतीक्षा यादीत आहेत. दत्तात्रय वारे गुरुजी आणि वाबळेवाडीची शाळा हे आज कौतुकाचे धनी आहेत. पण इथपर्यंत येणं सोपं होतं का? तर अजिबात नाही. प्रयोग यशस्वी झाला तर कौतुक होतं पण सुरुवात सोपी नसते. मग वारे गुरुजींनी 'जगातील सर्वोत्तम शाळा' हे कसं साध्य केलं?
दत्तात्रय वारे यांचं शिक्षक होणं हेच स्वप्न आणि ध्यास. म्हणून २०१२ ला वाबळेवाडीच्या शाळेवर रुजू झाले तेव्हापासूनच गुरुजींना शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची असावी यासाठी त्यांचे प्रयत्न चालू होते. आंतरराष्ट्रीय शाळा म्हणजे उंच इमारती, रंगरंगोटी ही अशी साधारण कल्पना आपण करतो. पण गुरुजींना खऱ्या अर्थाने शिक्षण देणारी शाळा घडवायची होती. खऱ्या अर्थाने म्हणजे काय तर ही मुलं लिहिणं-वाचन तर शिकतीलच पण या मुलांचा सर्वांगीण विकास करणारी ही शाळा असावी, अशी शाळा वारे गुरुजींना अपेक्षित होती. वाबळेवाडीच्या शाळेत आले तेव्हा जेमतेम विद्यार्थी असलेली जुनाट खोल्यांमध्ये ही शाळा भरायची.
गुरुजींनी शिक्षणाच्या पद्धती समजून हळूहळू बदल चालू केले. सगळ्यात आधी या शाळेत चार पद्धतीने विद्यार्थी कसं शिकतात ते समजून घ्या. स्वतः शिकणे, मित्रांकडून शिकणे, तंत्रज्ञानाची मदत घेणे आणि शेवटी शिक्षकाकडून शिकणे अशी पद्धती वारे गुरुजींनी निर्माण केली आहे. वारे गुरुजींनी त्यांच्या अनुभवाने ही पद्धती अवलंबली होती. यासाठी त्यांनी एक उदाहरण सांगितलं की एकदा ते गणित शिकवत होते. एकदा, दोनदा, तीनदा सांगून झालं तरी एका विद्यार्थ्याला हे गणित काय समजत नव्हतं. गुरुजीं हलकासा आवाज वाढणार तोच साक्षी नावाची मुलगी म्हणाली, गुरुजी मी त्याला शिकवते. एवढ्या लहान साक्षीचा समजूतदार स्वभाव बघून गुरुजींना सुखद धक्का बसला. पण खरा धक्का तर दुसऱ्या दिवशी बसला जेव्हा दुसऱ्या दिवशी ज्या मुलाला गणित समजत नव्हतं त्याला ती सगळी गणितं जमायला लागली होती. या प्रसंगाकडे गुरुजी सकारात्मक पाहू शकले म्हणूनच यांच्या शाळेतील सगळी मुलं एकमेकांना शिकवत असतात. 'विद्यार्थ्यांना संधी दिली तर शिक्षक घडतील' हे वारे गुरुजी का म्हणतात हे या प्रसंगावरून कळतं.
वारे गुरुजींच्या शाळेत शिकणारी मुलं काय काय करत असतात, कसे शिकत असतात हे शिक्षणाचे मॉडेल म्हणून आज समोर येत आहे. वारे गुरुजी यांची मेहनत, जिद्द यापाठीमागे आहेच. पण हे सगळं घडत असताना गावकऱ्यांची भूमिका सुद्धा खूप महत्त्वाची होती. शाळेला जमीन देताना गावकऱ्यांनी त्या जमिनीच्या बदल्यात मिळणाऱ्या करोडो रुपयांवर पाणी फेकलं. सढळ हस्ते शाळेला जमीन देणग्या दिल्या. एवढंच नाही तर गावच्या यात्रा, कार्यक्रम बंद करून शाळेला पैसे दिले. म्हणूनच आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा उभी राहू शकली. वारे गुरुजी आणि असे गावकरी असतील महाराष्ट्रात अजून अशा अनेक शाळा घडतील. वारे गुरुजींनी फक्त वाबळेवाडी नाही तर यानंतर जालिंदरनगरमध्ये सुद्धा हा प्रयोग यशस्वी करून दाखवला. ही प्रेरणा प्रत्येकाने घ्यावी आणि प्रत्येक गावखेड्यात असे गुरुजी आणि गावकरी तयार व्हावेत मग शिक्षण व्यवस्था सुधारायला आणि भविष्य घडवायला वेळ लागणार नाही.
***************************


