कोल्हापूर न्यूज नेटवर्क
कृषी पंपांसाठी दिवसा वीज मिळण्यासाठी प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. त्यासाठी मुख्यमंत्री सौर ऊर्जा कृषी वाहिनी योजनेंतर्गत जिथे जिथे जागा मिळेल तिथे तिथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी प्रयत्न करू, असे ते म्हणाले.
बामणी येथे सिद्धनेर्ली उपकेंद्रांतर्गत उभारण्यात आलेल्या तीन मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संजय घाटगे होते.
बामणी (ता. कागल) येथे सिद्धनेर्ली उपकेंद्रांतर्गत उभारण्यात आलेल्या तीन मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. हैद्राबादस्थित मेघा इंजिनियरिंग अँड ईन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्यावतीने हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.
कागल मतदारसंघात चार ठिकाणी सौर प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर आहेत. कागल शहरात आवश्यक असल्यास भाडेतत्त्वावर जागा घेऊनही सौर प्रकल्प उभारण्यात येईल. ज्या भागांत जागेची अडचण आहे, त्या ठिकाणी तहसीलदार कार्यालयामार्फत पाहणी करून अहवाल मागवण्यात आला आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला जाईल असे प्रतिपादन मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी केले.
यावेळी माजी आमदार संजयबाबा घाटगे, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ प्रताप माने, तहसीलदार अमरदीप वाकडे, अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास पंचायत समितीच्या सभापती सौ. सुवर्णा पाटील, सदस्य दत्तात्रय दंडवते, जिल्हा परिषद सदस्य सौ. सुयशा घाटगे, सरपंच सौ. अनुराधा पाटील, उपसरपंच सुनीता पाटील, बाजार समितीचे चेअरमन नानासाहेब कांबळे, दत्ता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यकारी अभियंता दत्तात्रय भणगे यांनी स्वागत केले. अभय आळवेकर यांनी आभार मानले.
राजे बँकेचे माजी अध्यक्ष एम. पी. पाटील यांनी प्रकल्पाच्या २५ वर्षांच्या कालावधीत ग्रामपंचायतीला आर्थिक अनुदान सुरू ठेवावे, नळपाणी पुरवठा योजनेस मोफत वीज द्यावी. तसेच प्रकल्पासाठी लागणारे कर्मचारी गावातीलच भरती करावेत, अशा मागण्या त्यांनी मांडल्या. मंत्री मुश्रीफ यांनी मागण्या तातडीने मान्य करण्याचे आश्वासन दिले.
*************

