कोल्हापूर न्यूज नेटवर्क
लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय (SAI) कुस्ती संकुल, मुरगुडची 'डबल महिला महाराष्ट्र केसरी' पैलवान अमृता शशिकांत पुजारी हिने कुस्ती क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. तिची व्हिएतनाम येथे होणाऱ्या '२३ वर्षाखालील आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी' ७२ किलो वजनगटात भारतीय संघात निवड झाली आहे. या निवडीमुळे कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
आशियाई अजिंक्यपद स्पर्धा २३ मे २०२६ ते ३१ मे २०२६ या कालावधीत व्हिएतनाम येथे पार पडणार आहे. या स्पर्धेत अमृता भारताचे प्रतिनिधित्व करत आशिया खंडातील मातब्बर मल्लांशी दोन हात करणार आहे.
अमृताच्या या दैदिप्यमान यशामागे तिची कठोर मेहनत आणि लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुलातील दर्जेदार प्रशिक्षणाचे मोठे योगदान आहे.
अमृताला पै. दादासो लवटे सर (आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक) व पै. दयानंद खतकर सर यांच्या तांत्रिक मार्गदर्शनामुळे कुस्ती अधिक आक्रमक आणि कौशल्याने परिपूर्ण करता आली आहे, त्यांनी अमृताच्या सातत्यपूर्ण सरावावर आणि फिटनेसवर भर दिला.
संकुलाच्या माध्यमातून खेळाडूंना मिळणाऱ्या सोयी-सुविधा आणि माजी खासदार मा. संजय दादा मंडलिक व कार्याध्यक्ष ऍड. विरेंद्र भैय्या मंडलिक यांचे खंबीर पाठबळ यामुळेच ग्रामीण भागातील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत.
सर्वत्र कौतुकाचा वर्षाव
अमृता पुजारीने यापूर्वी सलग दोनवेळा 'महिला महाराष्ट्र केसरी' होण्याचा बहुमान पटकावून आपली ताकद सिद्ध केली होती. आता तिची भारतीय संघात निवड झाल्याने मुरगुड शहरात आनंद साजरा करण्यात येत आहे. कुस्ती क्षेत्रातून आणि सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, ती व्हिएतनाममध्ये तिरंगा फडकवेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
------------------------


