कोल्हापूर न्यूज नेटवर्क
गगनबावडा / प्रतिनिधी
शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय भारत सरकार यांच्या शैक्षणिक कार्यक्षमता निर्देशांकात कोल्हापूर जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक पटकावल्याने गगनबावडा तालुक्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. दुर्गम व डोंगराळ भाग म्हणून ओळख असलेल्या गगनबावडा तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी , शिक्षण विस्तार अधिकारी ,केंद्रप्रमुख 'मुख्याध्यापक सर्व शिक्षक 'तसेच ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडत असल्याची भावना व्यक्त होत आहे. कोल्हापूर जिल्ह्याने ६०० पैकी ४६३ गुण मिळवत देशात अव्वल स्थान मिळविले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत जिल्ह्याने मोठी झेप घेतली असून “मिशन उत्कर्ष” या उपक्रमाचा त्यामध्ये मोठा वाटा मानला जात आहे.
गगनबावडा तालुक्यातही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले. डिजिटल शिक्षण, अध्ययन चाचण्या, शिक्षक प्रशिक्षण, विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढविणे तसेच शाळास्तरावर नियमित मूल्यमापन यामुळे शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यास मदत झाली. तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांनी शैक्षणिक गुणवत्ता, उपस्थिती आणि निकालामध्ये उल्लेखनीय प्रगती केली आहे. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी शिक्षकांनी अतिरिक्त मेहनत घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जिल्ह्याच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही नवी प्रेरणा मिळाली असून आगामी काळात गगनबावडा तालुका शिक्षण क्षेत्रात आणखी प्रगती करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
------------------------------
“शिक्षण विभागाचे काम कौतुकास्पद” - सभापती सौ.छाया देसाई
कोल्हापूर जिल्ह्याला शैक्षणिक कार्यक्षमतेत देशात प्रथम क्रमांक मिळणे ही अभिमानाची बाब आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचविण्यासाठी शिक्षण विभागाने केलेले काम अत्यंत चांगले आणि कौतुकास्पद आहे. शिक्षक, अधिकारी व पालक यांच्या संयुक्त प्रयत्नातून हे यश मिळाले असून भविष्यातही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी असेच प्रयत्न सुरू राहावेत, अशी अपेक्षा पंचायत समिती सभापती छाया प्रकाश देसाई यांनी व्यक्त केली.
------------------------------


