कोल्हापूर न्यूज नेटवर्क
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुरगूड येथील सरपिराजीराव तलाव व तलावाला पाणी पुरवठा करणाऱ्या नैसर्गिक ओढ्याची स्वच्छता येथील शिवभक्त तरुणांनी केली. दरवर्षीप्रमाणे यंदाही राबविण्यात आलेल्या या उपक्रमात पहाटे साडेपाच ते सकाळी साडेआठ वाजेपर्यंत तब्बल तीन तास श्रमदान करण्यात आले.
स्वच्छता मोहिमेदरम्यान तलाव परिसरातून सुमारे तीन ट्रॉली कचरा गोळा करण्यात आला. यामध्ये तब्बल ८०० हून अधिक दारूच्या बाटल्या, २०० पेक्षा अधिक शीतपेयांच्या बाटल्या तसेच मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व अन्य कचऱ्याचा समावेश होता.
मद्यपींनी फोडलेल्या बाटल्यांच्या काचा, काटे आणि इतर धोकादायक वस्तूंची पर्वा न करता तरुणांनी परिसर स्वच्छ केला.
सदर ओढा हा तलावाला नैसर्गिकरीत्या पाणी पुरवठा करणारा महत्त्वाचा जलश्रोत असल्याने त्याची स्वच्छता करण्यात आली. यंदाचे या उपक्रमाचे सलग पाचवे वर्ष असल्याची माहिती सहभागी तरुणांनी दिली.
हे तरुण दरवर्षी नदी, ओढे, स्मशानभूमी तसेच मुरगूड शहर व परिसरातील विविध सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करतात. याशिवाय वाघापूर, घोडेकर आणि कुरणी यात्रेनंतर निर्माण झालेला कचरा साफ करण्याचे कामही ते सातत्याने करत असतात.
पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल नागरिकांकडून तरुणांचे कौतुक करण्यात येत आहे.यावेळी शिवभक्त सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, तानाजी भराडे, अमोल मेटकर, प्रफुल्ल कांबळे, रघुनाथ बोडके,अक्षय पोतदार ,नामदेव भराडे, आनंदा रामाने, शिवाजी चौगले, सुनील शेलार, आनंदा मोरे बाळासो भराडे, अमर सुतार, विवेक कुंभार, एकनाथ भराडे आणि त्यांच्या अकॅडमीचे विद्यार्थी उपस्थित होते.
-------------------------


