मुरगुडची पैलवान अंजली वेताळ आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी पात्र; थायलंडमध्ये करणार भारताचे प्रतिनिधित्व!

Kolhapur news
By -

 

           


                    कोल्हापूर न्यूज नेटवर्क   


लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय (SAI) कुस्ती संकुल, मुरगुडची उदयोन्मुख महिला पैलवान अंजली संतोष वेताळ हिने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर आज झालेल्या १५ वर्षांखालील आशियाई अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत तिने ६२ किलो वजनगटात सुवर्णयश मिळवले. या दणदणीत विजयामुळे तिची थायलंड येथे होणाऱ्या आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड निश्चित झाली आहे.


अंजलीचा हा विजय अत्यंत खडतर आणि कौतुकास्पद ठरला. स्पर्धेपूर्वी तिला गंभीर दुखापतीचा सामना करावा लागला होता. मात्र, कोणत्याही संकटाला न डगमगता तिने मोठ्या आत्मविश्वासाने आणि जिद्दीने या दुखापतीवर मात केली. निवड चाचणीत प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारीत तिने नोंदवलेला विजय कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.


अंजलीच्या या ऐतिहासिक यशाबद्दल सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. माजी खासदार संजय दादा मंडलिक, कार्याध्यक्ष ऍड. विरेंद्र भैय्या मंडलिक आणि 'साई'चे माजी राज्य समन्वयक चंद्रकांत चव्हाण सर यांनी अंजलीच्या दैदीप्यमान कामगिरीचे कौतुक केले. तसेच, या यशाचे शिल्पकार असलेले कुस्ती संकुलाचे मुख्य प्रशिक्षक दादासो लवटे सर आणि दयानंद खतकर सर यांच्या मार्गदर्शनाची प्रशंसा करत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. अंजलीच्या या यशामुळे क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.



    अंजली वेताळ red custom (लाल रंगाच्या किट) मध्ये आहे. 

            --------------------------