अंजली वेताळची थायलंडमध्ये विजयी घोडदौड,जिंकले आशियाई कांस्यपदक!

Kolhapur news
By -

 


              



           

                        


                    कोल्हापूर न्यूज नेटवर्क   


शारीरिक इजा आणि डॉक्टरांनी दिलेला खेळ थांबवण्याचा सल्ला सुद्धा मनात ठेवलेलं स्वप्न पूर्ण करण्यापासून खऱ्या खेळाडूला थांबवू शकत नाही, याचाच प्रत्यय पै. अंजली संतोष वेताळ हिने दिला. 'लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय (SAI) कुस्ती संकुल, मुरगुड'ची खेळाडू अंजलीने पटाया (थायलंड) येथे झालेल्या १५ वर्षाखालील मुलींच्या आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक (Bronze Medal) जिंकून भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवला.


वडिलांची प्रेरणा आणि नियतीचा आघात


हिंदकेसरी पै. संतोष (आबा) वेताळ यांची कन्या असलेल्या अंजलीने लहानपणापासूनच वडिलांचा वारसा पुढे चालवत आंतरराष्ट्रीय पदक जिंकण्याचे स्वप्न पाहिले, मात्र दोन वर्षांपूर्वी कुस्ती खेळताना तिला अतिशय गंभीर दुखापत झाली. डॉक्टरांनी परिस्थितीचे गांभीर्य पाहून तिला कुस्ती थांबवण्याचा सल्ला दिला.पण तिच्या स्वप्नाने तिला  विश्रांती घेऊ दिली नाही. 



डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरही अंजलीच्या मनातील कुस्तीचे स्वप्न तिला शांत बसू देत नव्हते. मुलीची ही तगमग आणि इच्छाशक्ती पाहून वडील पै. संतोष वेताळ कमालीचे बेचैन झाले. त्यांनी आपली ही सल मंडलिक संकुलाचे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक दादासो लवटे सर यांच्याकडे बोलून दाखवली.



अंजलीच्या डोळ्यांतील  जिद्द ओळखून लवटे सरांनी तिला पुन्हा उभे करण्याचे निश्चित केले. दुखापतीवर मात करत त्यांनी अंजलीचे विशेष आणि खडतर प्रशिक्षण सुरू केले. गुरु-शिष्यांच्या या अपार मेहनतीला अखेर थायलंडच्या मातीत यश आले. अंजलीने आशियाई मॅटवर कांस्यपदक पटकावून आपल्या अश्रूंचे रूपांतर विजयात केले.



अंजलीच्या या ऐतिहासिक यशाबद्दल मंडलिक संकुलाचे प्रमुख व माजी खासदार संजय दादा मंडलिक, कार्याध्यक्ष ऍड. विरेंद्र भैय्या मंडलिक, सुनील चव्हाण साहेब सह आयुक्त राज्य उत्पादन शुल्क मुंबई ,SAI चे माजी राज्य समन्वयक चंद्रकांत चव्हाण सर आणि डॉ. प्रशांत अथणी सर यांनी तिचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.





          ---------------------------------