कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड ता. कागल येथील जिल्हा परिषदेची शिवाजी विद्या मंदिर शाळा नं.2 या शाळेत नवागात शालेय विद्यार्थ्यांचे स्वागत नावीन्यपूर्ण पद्धतीने करण्यात आले.
शाळेत येणाऱ्या या विदयार्थी विद्यार्थिनींना चक्क फेटे बांधण्यात आले आणि त्यांची बैंलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. ग्राम दैवत आंबाबाई मंदिरा समोर नगराध्यक्षा सौ. सुहासिनीदेवी प्र. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वागत समारंभ संपन्न झाला.लेझीम आणि कैताळ या वाद्यांच्या गजरात मिरवणूक शिवाजी विद्यामंदिर येथे पोचल्या नंतर शाळा समितीच्या उपाध्यक्षा वर्षा भोसले यांच्या हस्ते शाळेची घंटा वाजवून नव्या शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ करण्यात आला.
शहर पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष सत्यजितसिंह पाटील यांनी यावेळी मनोगतात सांगितले की जिल्हा परिषदेच्या शाळा या सर्वसामान्यांच्या हक्काची शिक्षण केंद्रे आहेत. या केंद्रातून ज्ञानदानाची अखंड परंपरा सुरु आहे.
शाळा समितीचे अध्यक्ष विजय मेंडके यांनी सर्वांचे स्वागत केले. मुख्याध्यापक प्रवीण आंगज व अन्य शाळा समिती सदस्य यांनी गुलाब पुष्पे, अंकलीपी,पाटी इत्यादी शैक्षणिक साहित्य देऊन मुलांचे अभिनंदन केले.
---------------------

